प्रचाराला आलेल्या उपमुख्यमंत्र्यांना गावकऱ्यांनी पिटाळले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 05:18 PM2019-04-01T17:18:20+5:302019-04-01T17:19:22+5:30
एन. चिनाराजप्पा हे पूर्व गोदावरी जिल्हातील हुसेन पूरम गावात प्रचारासाठी गेले असताना त्यांना गावकऱ्यांच्या रोषाला समोर जावे लागले.
अमरावती - आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री एन. चिनाराजप्पा यांना जनतेच्या रोषाला समोर जावे लागले आहे. आंध्रप्रदेशमध्ये ११ एप्रिल रोजी १७५ विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक होणार आहे. तर त्याच दिवशी २५ लोकसभा मतदारसंघांमध्ये सुद्धा मतदान होणार आहेत. त्यामुळे सर्वच पक्षाचे नेत्यांच्या प्रचारासाठी मतदार संघात भेटी-गाठी सुरू आहेत. मात्र आंध्रप्रदेशमध्ये प्रचारासाठी गेलेल्या तेलगु देसम पक्षाचे एन. चिनाराजप्पा यांना नागरिकांनी विकासाच्या मुद्दावर गावात येण्यापासून रोखले असल्याचे समोर आले आहे. गावकऱ्यांच्या विरोधामुळे अखेर चिनाराजप्पा यांच्यावर माघारी जाण्याची वेळ आली.
तेलगु देसम पक्षाचे पेद्दापूरम विधानसभा सदस्य निवडून आलेले एन. चिनाराजप्पा उपमुख्यमंत्री पदावर विराजमान आहे. आंध्रप्रदेशमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी एन. चिनाराजप्पा हे पूर्व गोदावरी जिल्हातील हुसेन पूरम गावात प्रचारासाठी गेले असताना त्यांना गावकऱ्यांच्या रोषाला समोर जावे लागले. विकास कामे काय केलीत, असा जाब विचारत गावकऱ्यांनी त्यांना गावात येण्यापासून रोखले. त्यामुळे चिनाराजप्पा यांना माघारी जावे लागले.
पेद्दापूरम विधानसभा मतदारसंघ हे चिनाराजप्पा यांचा मतदारसंघ आहे. २०१४ मध्ये ते याच मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांना मंत्रीपद मिळाले होते. तरी देखील विकास कामांना प्राधान्य देण्यात ते अपयशी ठरल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. गावकऱ्यांनी चिनाराजप्पा यांना गावात प्रचार करण्यापासून रोखल्याने चर्चेचा विषय बनला आहे.