संतापजनक! दलित असल्याने भाजपा खासदाराला नाकारला गावात प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 12:48 PM2019-09-17T12:48:07+5:302019-09-17T12:50:20+5:30
काळ बदलला तरी आजही अनेक ठिकाणी कनिष्ठ जातीच्या व्यक्तींना भेदभावाचा सामना करावा लागतो. दरम्यान, खुद्द एका खासदारालाच जातीभेदाचा सामना करावा लागला आहे.
बंगळुरू - काळ बदलला तरी आजही अनेक ठिकाणी कनिष्ठ जातीच्या व्यक्तींना भेदभावाचा सामना करावा लागतो. दरम्यान, कर्नाटकमध्ये खुद्द एका खासदारालाच जातीभेदाचा सामना करावा लागला आहे. कर्नाटकमधील चित्रदुर्ग येथील खासदार असलेल्या ए. नारायणस्वामी यांना दलित असल्याने गावात प्रवेश नाकारला गेला. तुमकूर जिल्ह्यातील पवागडा येथे ही घटना घडली.
खासदार ए. नारायण स्वामी यांनी आरोप केला की, ''मी अधिकाऱ्यांसह गोला समुदायाची वस्ती असलेल्या गोलारहट्टी या गावात गेलो होतो. तिथे काही लोकांनी मला सांगितले की मी अनुसूचित जातीमधील आहे. त्यामुळे मला गावात प्रवेश करण्याची परवानगी देता येणार नाही.'' आता या प्रकरणी पोलीस अधीक्षकांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
गोलारहट्टी येथे आधीपासूनच उपस्थित असलेल्या काही लोकांनी नारायणस्वामी यांना माघारी परतण्यास सांगितले. गोलारहट्टीमध्ये कुठल्याही दलित वा कनिष्ठ जातीमधील व्यक्तीचा प्रवेश निषिद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. खासदार नारायणस्वामी हे दलित जातीमधून येतात. तर गोलारहट्टीमध्ये वास्तव्यास असलेला गोला समुदाय हा इतर मागासवर्गीयांमध्ये मोडतो.
या गावामध्ये आतापर्यंत कुठल्याही मागास जातीमधील व्यक्तीला प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही, असे उपस्थितांनी नारायणस्वामी यांना सांगितले. त्यानंतर दोन्हीकडून झालेल्या किरकोळ वादानंतर नारायणस्वामी यांनी तेथून काढता पाय घेतला. त्यानंतर पोलिसांनी चौकशीचे आदेश दिले. दरम्यान, नारायणस्वामी यांना अडवणारे लोक नेमके कोण होते, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. सध्या त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.