"आम्ही बजरंग बलीचे भक्त आहोत, बॅरिकेड्स तोडले नाहीत", विनेश फोगाटचं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 08:04 PM2023-05-08T20:04:04+5:302023-05-08T20:04:33+5:30
Wrestlers vs WFI : भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा धरणे आंदोलन करत आहेत.
brij Bhushan Singh । नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधातील आंदोलक पैलवानांची आखाड्याबाहेरील कुस्ती अद्याप सुरूच आहे. २३ एप्रिलपासून आंदोलक पैलवान दिल्लीतील जंतरमंतरवर धरणे आंदोलन करत आहेत. आंदोलकांच्या समर्थनासाठी शेतकऱ्यांनी देखील हजेरी लावली होती. या निदर्शनात बॅरिकेड्स तोडल्याची घटना उघडकीस आली होती. एवढेच नाही तर पंतप्रधान मोदींच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. पंजाबमधून आलेल्या शेतकऱ्यांनी ही घोषणाबाजी केल्याचे बोलले जात आहे.
याबाबत पैलवान विनेश फोगाटने सांगितले की, आम्ही बजरंग बलीचे भक्त आहोत. एकही बॅरिकेड तोडला नाही. आमच्या लोकांनी घोषणा देखील दिल्या नाहीत. काही समाजकंटकांनी घोषणाबाजी केली. शेतकरी संघटना आमच्या पाठीशी असल्याचे फोगाटने स्पष्ट केले. या घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी सांगितले की, जंतरमंतरवर आंदोलकांना आवश्यक सुविधा दिल्या जात आहेत. सुरक्षेची दखल घेऊन ठिकठिकाणी तपासणी केली जात आहे. पोलिसांनीही सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
ब्रिजभूषण शरण सिंह यांनी महिला पैलवानांचा लैंगिक छळ केला असून त्यांना अटक करावी ही मागणी पैलवानांची आहे. दिल्ली पोलिसांनी सिंह यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे. मात्र, अटक होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे पैलवानांचे म्हणणे आहे. जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला शेतकऱ्यांसह विविध राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे.
आखाड्याबाहेरील 'कुस्ती'
लक्षणीय बाब म्हणजे ऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेती साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांसह देशातील ७ नामांकित पैलवानांनी २३ एप्रिल रोजी आंदोलनाचे हत्यार उपसले. आंदोलनाला दोन आठवडे उलटून गेले असून अद्याप भारतीय कुस्ती महासंघाविरोधात खेळाडू जंतरमंतरवर धरणे आंदोलन करत आहेत. प्रशिक्षक महिलांचा छळ करत आहेत आणि फेडरेशनचे काही जवळचे लोक प्रशिक्षक महिला प्रशिक्षकांशीही गैरवर्तन करतात. ते मुलींचा लैंगिक छळ करतात. भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) अध्यक्षांनी अनेक मुलींचा लैंगिक छळ केला आहे, असे गंभीर आरोप महिला पैलवानांनी केले आहेत. खरं तर ब्रिजभूषण यांनी केलेल्या दाव्यानुसार आता केवळ तीन पैलवान आंदोलनस्थळी आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"