आलोकनाथविरोधात विनता नंदा यांची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 05:52 AM2018-10-18T05:52:52+5:302018-10-18T05:52:58+5:30
न्यायासाठी नंदानीचे पंतप्रधानांना पत्र, चौकशीअंती गुन्ह्याचे पोलिसांचे आश्वासन
मुंबई : लेखिका विनता नंदा यांनी बुधवारी अभिनेते आलोकनाथ यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. चौकशीअंती आलोकनाथ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी विनता नंदा यांनी दिली.
विनता नंदा यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुक पोस्टद्वारे आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. ओशिवरा पोलिसांनी माझी तक्रार घेतली आहे. आता पुढील प्रक्रियेला सुरुवात होईल. मला मंगळवारी संध्याकाळी मानहानी प्रकरणी नोटीस मिळाली आहे. माझे वकील यासंदर्भात काम करीत आहेत. ते सध्या दिंडोशी न्यायालयात आहेत, अशी माहिती विनता नंदा यांनी दिली.
दरम्यान, विनता नंदा यांनी आता या प्रकरणी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोशल मीडियावर पत्र लिहीत लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या सर्व महिलांना मदत करण्याची विनंती केली आहे. भारत हा देश महिलांसाठी नाही, असे सगळे म्हणतात; या सगळ्यांना खोटे ठरवा. इथल्या प्रत्येक महिलेच्या पाठी तुम्ही खंबीरपणे उभे आहात हे दाखवून देण्याची वेळ आता आली आहे, अशी विनंती त्यांनी पत्रातून केली आहे.
माझे शोषण होऊनही नवाजुद्दीन गप्प होता - चित्रांगदा
‘मीटू’च्या मोहिमेत अभिनेत्री चित्रांगदा सिंगही समोर आली आहे. २०१७ मध्ये ‘बाबूमोशाय बंदुकबाज’ सिनेमातून मी काढता पाय घेतला होता; कारण दिग्दर्शकाने कथानकात बदल करून ऐनवेळी मला नवाजुद्दीन सिद्दिकीसोबत बेड सीन करण्यास सांगितले. मला तो सीन करण्याची धमकी दिग्दर्शक आणि निर्मात्याने दिली होती. हा सगळा प्रकार नवाजुद्दीनच्या समोर सुरू होता. तो माझी बाजू घेईल, अशी मला अपेक्षा होती. पण तो काहीही बोलला नाही. त्यामुळे मी तो सिनेमा सोडला.