विनोद तावडेंनी केली कमाल, चंढीगडमध्ये 'आप'ला धोबीपछाड देत भाजपचा महापौर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2022 10:46 PM2022-01-08T22:46:13+5:302022-01-08T22:46:56+5:30
भारतीय जनता पक्षाने चंडीगड येथे प्रभारी म्हणून राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते विनोद तावडे (Vinod Tawade) यांना नेमले आहे.
नवी दिल्ली - चंदीगड महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाने (आप) ३५ पैकी १४ जागा जिंकून सगळ्यात मोठ्या पक्षाचे स्थान मिळवले तर भाजपला १२, काँग्रेसला ८ आणि एक जागा शिरोमणी अकाली दलाला जिंकता आली होती. महापौरपदासाठी पक्षाला १९ नगरसेवकांचा पाठिंबा आवश्यक होता. मात्र, १९ नगरसेवकांचा पाठिंबा मिळविण्यात केजरीवाल यांच्या आपला यश मिळालं नाही. त्यामुळे, चंदीगडमध्ये सर्वात मोठा पक्ष असतानाही आम आदमी पक्षाचा महापौर झालाच नाही. येथे भाजप नेते विनोद तावडेंच्या प्रभारी नेतृत्वात भाजपचा महापौर बनला.
भारतीय जनता पक्षाने चंडीगड येथे प्रभारी म्हणून राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते विनोद तावडे (Vinod Tawade) यांना नेमले आहे. तावडे यांच्या नेतृत्वात भाजपला निवडणुकीत यश मिळाले नसले तरी महापौरपदी भाजप नेत्याला बसविण्यात तावडेंनी यश मिळवून दाखवले आहे. विशेष म्हणजे भाजपच्या महापौर निवडीचा परिणाम पंजाबच्या आगामी निवडणुकांवरही दिसेल, असेही ट्विटमध्ये तावडेंनी म्हटले आहे.
भाजपा के निरंतर जीत के अभियान में इस साल का पहला पड़ाव #चंडीगढ़_मेयर , सीनियर डिप्टी मेयर और डिप्टी मेयर चुनाव में हुई जीत है। हमें पूरा विश्वास है कि पंजाब के आगामी विधानसभा चुनावों में भी @narendramodi सरकार की विकास नीतियों को जनता का समर्थन प्राप्त होगा।
— Vinod Tawde (@TawdeVinod) January 8, 2022
@BJP4India
चंदीगड महापालिकेत १२ जागा जिंकणाऱ्या भाजपने आपल्या पक्षाचा महापौर बनविला आहे. भाजपच्या सरबजीत कौर चंदीगडच्या महापौर बनल्या आहेत. आम आदमी पक्षाचे एक मत बॅलेट पेपर फाटल्याने रद्द झाले होते. त्यामुळे, निवडणुकीचा निकाल आल्यानंतर आपचे सर्वच नगरसेवक धरणे आंदोलनावर बसले होते. सिनीयर उपमहापौर पदाच्या खुर्चीवर भाजपच्या दिलीप शर्मा यांनी विजय मिळवला. एकूण २८ मतांपैकी भाजपच्या दिलीप शर्मा यांना १५ तर आम आदमी पक्षाच्या प्रेमलता यांना १३ मत मिळाली. दरम्यान, महापौर पदासाठी केवळ महिलांना अर्ज दाखल करता येत होता. कारण, पहिल्या आणि चौथ्या वर्षासाठी ही जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे.
या निवडणुकीत काँग्रेसचे सात आणि अकाली दलाचा एक असे आठ नगरसेवक तटस्थ राहिले. निवडणुकीत काँग्रेसची कोंडी झाली. कारण भाजपला हरविण्यासाठी ते `आप`ला मतदान करू शकत नव्हते. भाजपचे तेरा नगरसेवक होते. पण तेथील भाजपच्या खासदार किरण खेर या महापालिकेच्याही सदस्य असतात, असा नियम भाजपने दाखवला. त्यामुळे भाजपला तेरा सदस्य निवडून आलेले असताना चौदा मते मिळाली
मतदारांनी काँग्रेसलाही नाकारले
चंदीगडमध्ये महापालिका निवडणुकंसाठी २४ डिसेंबरला मतदान झाले व ६० टक्क्यांपेक्षा जास्त मतदारांनी मतदान केले. काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांच्या तुलनेत आपचे उमेदवार अनुभवी नव्हते तरीही मतदारांनी दोन्ही मोठ्या पक्षांना नाकारून ‘आप’वर विश्वास टाकला. विशेष म्हणजे भाजपचे महापौर रविकांत शर्मा यांचा या निवडणुकीत पराभव झाला.