विनोद तावडेंनी केला केजरीवालांचा ‘गेम’, चंडीगडमध्ये आपचे ३ नगरसेवक भाजपात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 09:05 AM2024-02-19T09:05:48+5:302024-02-19T09:07:10+5:30
Chandigarh Mayor Election: महापौर निवडणुकीत गडबड झाल्याचा आरोप होत असतानाच चंडीगड महानगरपालिकेमध्ये भाजपाने मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. चंडीगड महानगरपालिकेतील आपचे ३ नगरसेवक भाजपामध्ये दाखल झाले आहेत.
महापौर निवडणुकीत गडबड झाल्याचा आरोप होत असतानाच चंडीगड महानगरपालिकेमध्ये भाजपाने मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. चंडीगड महानगरपालिकेतील आपचे ३ नगरसेवक भाजपामध्ये दाखल झाले आहेत. नेहा मुसावट, गुरचरण काला आणि पूनम देवी यांनी चंडीगडमधील भाजपाचे निवडणूक प्रभारी विनोद तावडे यांच्या उपस्थितीत या तिघांनीही भाजपात प्रवेश केला.
भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी आम आदमी पक्षाच्या तीन नगरसेवकांच्या भाजपा प्रवेशाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या लोककल्याणकारी धोरणामुळे प्रभावित होऊन चंडीगडमधील पूनम देवी, नेहा मुसावट आणि गुरचरण काला हे आपचे तीन नगरसेवक आज भाजपामध्ये दाखल झाले आहेत, असे विनोद तावडे यांनी म्हटले आहे.
प्रधानमंत्री @narendramodi जी के नेतृत्व में जनकल्याणकारी नीतियों से प्रभावित होकर चंडीगढ़ से आम आदमी पार्टी की पार्षद पूनम देवी, नेहा और गुरचरण काला जी आज दिल्ली में भाजपा में शामिल हुए।
— Vinod Tawde (@TawdeVinod) February 18, 2024
AAP ने उनके साथ धोखा किया है, लेकिन भाजपा उन्हें बिना किसी झूठे वादे के उनकी क्षमता के… pic.twitter.com/5U5RazpN4S
विनोद तावडे यांनी पुढे लिहिलं की, आम आदमी पक्षाने या नगरसेवकांची फसवणूक केली. मात्र भाजपा त्यांना कुठलीही खोटी आश्वासनं न देता न्याय देणार आहे. भाजपाच्या कुटुंबामध्ये तु्म्हा सर्वांचं स्वागत आहे. आम्ही सर्व एकत्र मिळून चंडीगडमधील नागरिकांच्या विकासासाठी काम करू.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात आज होणाऱ्या सुनावणीपूर्वी काही तास आधीच चंडीगडचे महापौर मनोज सोनकर यांनी रविवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे महानगरपालिकेत पुन्हा महापौर पदाची निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला होता. दरम्यान, चंडीगडमध्ये महापौरपदाची निवडणूक घेणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यावर सर्वोच्च न्यायालयाने कडक ताशेरे ओढले होते. या अधिकाऱ्यांनी मतपत्रिकांमध्ये फेरफार केली होती हे स्पष्ट आहे. त्यासाठी त्यांच्याविरोधात खटला चालला पाहिजे. तसेच त्यांनी केलेलं हे कृत्य लोकशाहीची हत्या आणि थट्टा आहे.
महापौर निवडणुकीत झालेल्या या घोटाळ्यामुळे संतप्त झालेले सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने सांगितले होते की, आम्ही अशा प्रकारे लोकशाहीची हत्या होऊ देणार नाही. तसेच सर्वोच्च न्यायालय हे निवडणूक प्रक्रियेबाबत समाधानी नसेल तर नव्याने निवडणूक घेण्याचे आदेश देऊ शकते.
३० जानेवारी रोजी झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार मनोज सोनकर यांनी आम आदमी पक्षाच्या कुलदीप कुमार यांना पराभूत केले होते. सोनकर यांना १६ तर कुमार १२ मतं मिळाली होती. तर ८ मतं ही बाद ठरवण्यात आली होती. या बाद ठरवण्यात आलेल्या मतांवरून मोठा वाद निर्माण झाला होता.