विनोद तावडेंचे डावपेच अन् लालू झाले ‘फेल’, बिहारमध्ये असं घडलं सत्तांतर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 06:45 AM2024-01-29T06:45:03+5:302024-01-29T06:45:36+5:30
Bihar Political Update: बिहारमधील सत्ता परिवर्तनाच्या राजकारणात भाजपचे प्रभारी विनोद तावडे यांच्या चतुर राजकीय डावपेचांमुळे राजकारणातील दिग्गज लालू यादव नितीश कुमार यांना रोखू शकले नाहीत आणि त्यांनी पुन्हा एकदा भाजपसोबत बॅटिंग सुरू केली आहे.
पाटणा - बिहारमधील सत्ता परिवर्तनाच्या राजकारणात भाजपचे प्रभारी विनोद तावडे यांच्या चतुर राजकीय डावपेचांमुळे राजकारणातील दिग्गज लालू यादव नितीश कुमार यांना रोखू शकले नाहीत आणि त्यांनी पुन्हा एकदा भाजपसोबत बॅटिंग सुरू केली आहे. विनोद तावडे हे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि बिहारचे प्रभारी आहेत, अशा स्थितीत भाजप नेत्यांची बैठक घेण्याची जबाबदारी तावडे यांच्याकडेच होती.
दुसरीकडे, जदयुचे संजय झा याप्रकरणी जोरदार बॅटिंग करत होते. २०१७ मध्येही नितीश यांना भाजपच्या जवळ आणण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. ते भाजपमधूनच राजकारणात आले. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांची भाजपशी असलेली जवळीक सर्वश्रुत आहे. अशा परिस्थितीत या राजकीय नाट्याच्या पटकथेला अंतिम रूप देण्यात हरिवंश यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, तर के. सी. त्यागी आणि विजय चौधरी यांनी या संपूर्ण पटकथेतील सर्व पात्रांमध्ये सामंजस्य राखण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते यशस्वी झाले. यासोबतच केंद्रीय मंत्री नित्यानंद राय, भाजप खासदार सुशील कुमार मोदी मैदानात होते. संधी मिळताच राजकारणातील खेळाडू नितीश कुमार यांनी असा षट्कार मारला की, लालू कुटुंबाला धक्काच बसला.
जनता सर्व काही पाहत आहे...
जनता मालक आहे, ती सर्व काही पाहत आहे, जनता प्रत्येक पैशाचा हिशेब मागणार आहे. राजदचा १५ महिन्यांचा कार्यकाळ एनडीएच्या कार्यकाळापेक्षा भारी आहे. तेजस्वी यादव यांनी शिक्षण, रोजगार आणि आरोग्य क्षेत्रात काम केले आहे. आम्ही जनतेत जाऊन एनडीए आणि नितीश यांची बोट बुडवू.
- मृत्युंजय तिवारी, प्रवक्ते, राजद