"धर्माच्या नावे मतं मागणं म्हणजे संविधानाच्या आत्म्याचं उल्लंघन''
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 10:48 AM2019-05-06T10:48:22+5:302019-05-06T10:51:26+5:30
माजी केंद्रीय मंत्री आरीफ मोहम्मद खान यांनी धर्माच्या नावे एकत्र येऊन मतदान करण्याचं आवाहन करणं म्हणजे संविधानाच्या आत्म्याचं एक प्रकारे उल्लंघन आहे.
नवी दिल्लीः माजी केंद्रीय मंत्री आरीफ मोहम्मद खान यांनी धर्माच्या नावे एकत्र येऊन मतदान करण्याचं आवाहन करणं म्हणजे संविधानाच्या आत्म्याचं एक प्रकारे उल्लंघन आहे. आरीफ मोहम्मद यांचे शाह बानो प्रकरणात राजीव गांधींशी मतभेद झाले होते, त्याच वेळी त्यांनी 1986मध्ये काँग्रेस सरकारला राजीनामा देऊन पक्षही सोडला होता. त्यानंतर ते भाजपामध्ये सहभागी झाले होते. परंतु भाजपापासूनही ते कालांतरानं दूर झाले. 1980पासून तीन तलाक विरोधात ते बोलत आहेत.
आरीफ मोहम्मद खान यांच्याशी डॉ. इंदुशेखर पंचोली यांनी बातचीत केली आहे. ते म्हणाले, लोकशाही निवडणुकीच्या माध्यमातून मजबूत होते. राजकीय संस्कृतीचा विकास ही महान उपलब्धी आहे. ती टिकवून ठेवण्यासाठी निवडणूक महत्त्वाची असते. मुस्लिमाचा भाजपाबाबतचा दृष्टिकोन बदललेला आहे काय?, यावर ते म्हणाले, मुस्लिम किंवा धार्मिक-सामाजिक समुदाय एक राजकीय भाग आहे. भारताला एक राष्ट्र न मानून विविध धर्म आणि जातींचे समुदाय मानत असलेल्यांनी निवडणुकीची व्यवस्था तयार केली. आपण आजही नागरिकाला नव्हे, तर त्याच्या समुदायातील प्रमुखाला महत्त्व देतो.
दुसरीकडे भारताचं संविधान नागरिकाला राष्ट्राचा एक भाग समजतं. तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर ते म्हणाले, तिहेरी तलाकचा मुद्दा हा मानवी संवेदनांशी जोडलेला आहे. हा कायदा क्रांतिकारी आहे. त्याला राजकारण आणि निवडणुकीशी जोडून त्याचं महत्त्व कमी करू नका. मला विश्वास आहे की, मोदींचा हा निर्णय इतिहासात नोंदवला जाणार असून, देशात लैंगिक समानताही कायम टिकून राहणार आहे.