दिल्लीत पुन्हा हिंसाचार; पोलीस चौकी जाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 06:11 AM2019-12-18T06:11:41+5:302019-12-18T06:12:39+5:30
सीलमपूर भागात पोलिसांवर दगडफेक : सात मेट्रो स्टेशन्स केली बंद
नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनास दिल्लीत मंगळवारी हिंसक वळण लागले. सीलमपूर भागात आंदोलकांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केल्याने पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. तब्बल दोन तासांनी तो भाग शांत झाल असला, तरी तिथे तणाव आहे. आंदोलकांनी दोन दुचाकी जाळल्या, तर पोलीस चौकी पेटवून दिली.
शांततेत मोर्चा सुरू असताना गर्दीतून पोलिसांवर दगडफेक सुरू झाली. काही आंदोलकांनी पोलिसांना मारहाण सुरू केली. त्यामुळे पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. नंतर ड्रोनद्वारे पाहणी करून पोलिसांनी काही जणांना ताब्यातही घेतले. या भागात गस्त घालण्यास सुरुवात केली. जमावाने दोन दुचाकी पेटवून दिल्या. पोलीस चौकीही जाळली. नंतर सात मेट्रो स्थानके काही काळ बंद ठेवण्यात आली.
सीलमपूर चौकात मोर्चा येताच पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यास मज्जाव केला. त्यामुळे आंदोलकांनी दगडफेक सुरू केली. नागरिकत्व कायदा, एनआरसीचा विरोध करणारे फलक लोकांच्या हाती होते.
केरळमध्ये बंदमध्येही आज हिंसाचार झाला. निदर्शकांनी अनेक बसेस जाळल्याचे वृत्त आहे.
विरोधकांचे राष्ट्रपतींना साकडे
रविवारी निदर्शने करणाऱ्या जामिया मिलियातील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना केली. नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्द करा, असेही साकडे या नेत्यांनी राष्ट्रपतींना घातले आहे.
सुप्रीम कोर्टाचा हस्तक्षेपास नकार
नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून जामिया व अलीगढ मुस्लीम विद्यापीठात झालेल्या हिंसाचारप्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. उच्च न्यायालयात दाद मागा, असेही न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सुचविले.