मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; ‘अफ्स्पा’ला ६ महिने मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 12:09 PM2023-09-28T12:09:59+5:302023-09-28T12:10:18+5:30
१ ऑक्टोबरपासून हाेणार अंमलबजावणी
इम्फाळ : मणिपूरमध्ये दोन बेपत्ता विद्यार्थ्यांची हत्या झाल्यानंतर हिंसाचारात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील डोंगराळ भागांमध्ये सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा (अफ्स्पा) आणखी सहा महिने लागू राहणार आहे. येत्या १ ऑक्टोबरपासून ही मुदत वाढविण्यात आली आहे. मणिपूरमधील १९ पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील प्रदेश वगळता राज्यातील अन्य प्रदेश अशांत क्षेत्र असल्याचे घोषित करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या हत्येनंतर पोलिस व निदर्शकांमध्ये चकमक झाली. बुधवारी इम्फाळमध्ये हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. पोलिसांच्या कारवाईत अनेक जण जखमी झाले आहेत.
‘शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू’
मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून स्थानिकांचे प्रश्न सोडवण्यासह आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले.
सीबीआयचे पथक चौकशीसाठी मणिपुरात
गेल्या ६ जुलैपासून बेपत्ता असलेल्या दोन विद्यार्थ्यांची हत्या झाल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआय विशेष संचालकांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक मणिपूरमध्ये बुधवारी आले.