मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, चुराचांदपूर जिल्ह्यात जोरदार गोळीबार; संसदेत गदारोळ सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 12:30 PM2023-07-27T12:30:31+5:302023-07-27T12:30:52+5:30
मणिपूर हिंसाचारावर देशभरातील रस्त्यांवर आंदोलने ते संसदेपर्यंत गदारोळ सुरू आहे. 20 जुलैपासून सुरू झालेले पावसाळी अधिवेशनात सातत्याने व्यत्यय येत आहे.
मणिपूर हिंसाचार आणि तरुणीची नग्न धिंड काढल्यावरून संसदेत गदारोळ सुरु असाताना पुन्हा हिंसाचार सुरु झाला आहे. आता चुराचांदपूर जिल्ह्यात हिंसाचार भडकला आहे. येथील थोरबुंग भागात जोरदार गोळीबार होऊ लागला आहे. या गोळीबारात किती जिवीतहाणी झाली याची माहिती अद्याप आलेली नाही. परंतू, हा भाग संवेदनशील बनला आहे.
मणिपूरमध्ये गेल्या ३ मे पासून हिंसाचार सुरु आहे. कुकी समाजाकडून काढण्यात आलेल्या आदिवासी एकचा मार्चवेळी हिंसा भडकली होती. यानंतर कुकी आणि मैतेई समाजामध्ये दररोज रक्तरंजित संघर्ष होत आहे. आतापर्यंत १६० हून अधिक लोकांनी प्राण गमावले आहेत. मणिपूरमध्ये मैतेई समाजाची लोकसंख्या ही ५३ टक्के आहे. तर ४० टक्के लोक हे नागा आणि कुकी समाजाचे आहेत.
मणिपूर हिंसाचारावर देशभरातील रस्त्यांवर आंदोलने ते संसदेपर्यंत गदारोळ सुरू आहे. 20 जुलैपासून सुरू झालेले पावसाळी अधिवेशनात सातत्याने व्यत्यय येत आहे. कामकाज होऊ शकत नाहीय. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. या प्रकरणी पंतप्रधानांना उत्तर देण्यासाठी त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना २६ जुलै रोजी अविश्वास प्रस्तावाची नोटीसही दिली, जी स्वीकारण्यात आली आहे. यावर चर्चेसाठी पुढील आठवड्यात वेळ देण्यात आली आहे.
राज्यसभेत मणिपूर हिंसाचारावर चर्चेची मागणी करत असताना सभापती जगदीप धनखड यांच्या खुर्चीसमोर जाऊन निषेध केल्याबद्दल आपचे खासदार संजय सिंह यांची संपूर्ण अधिवेशनासाठी हकालपट्टी करण्यात आली आहे.