मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, पिता-पुत्रासह चौघांची हत्या, राज्यामध्ये अतिरेकी हल्ल्याचीही शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 05:53 AM2024-01-20T05:53:33+5:302024-01-20T05:53:43+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६१ वर्षीय ओइनम बामोलजाओ आणि त्यांचा ३५ वर्षीय मुलगा ओइनम मनिटोम्बा यांची गुरुवारी बिष्णुपूर जिल्ह्यात संशयित दहशतवाद्यांनी हत्या केली.
इंफाळ : मणिपूरमध्ये हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही. गुरुवारी वेगवेगळ्या घटनांमध्ये एक व्यक्ती आणि त्याच्या मुलासह चार जणांची हत्या करण्यात आल्याने तणाव कायम आहे. गुप्तचर अहवालात अतिरेक्यांच्या हल्ल्याचा इशारा दिला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६१ वर्षीय ओइनम बामोलजाओ आणि त्यांचा ३५ वर्षीय मुलगा ओइनम मनिटोम्बा यांची गुरुवारी बिष्णुपूर जिल्ह्यात संशयित दहशतवाद्यांनी हत्या केली. गावाच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या ५४ वर्षीय थियाम सोमेनचीही गुरुवारी त्याच जिल्ह्यातील प्रतिस्पर्धी समुदायातील सशस्त्र व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली. दुसरीकडे, हिंसाचाराच्या संदर्भात निदर्शने करण्यात आली. इंफाळमध्ये एक मोर्चा काढण्यात आला, ज्यामध्ये लोकांनी सरकारला सुरक्षा व्यवस्था राखण्याचे आवाहन केले.
विदेशी शक्तींचा हात नाही
कमांडोंवरील हल्ल्यात परकीय शक्तींचा सहभाग असल्याचा कोणताही पुरावा नाही. सीमा सुरक्षा दलाची एक तुकडी आणि लष्कराच्या दोन तुकड्यांसह अतिरिक्त तुकड्या मोरे येथे पाठवण्यात आल्या आहेत. अतिरेक्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी पावले उचलली आहेत.
लष्कराची मदत
गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये म्यानमार सीमेवर सुरक्षा दलांवर होत असलेल्या हल्ल्यांमुळे केंद्र सरकारही गंभीर झाले आहे. राज्य सरकारच्या मागणीनुसार केंद्राने लष्कराचे विशेष हेलिकॉप्टर (एएलएच ध्रुव) इंफाळला पाठवले आहे.
कमांडो सैन्याची तैनाती हलविली
राज्य पोलिसांच्या तीन कमांडो तुकड्यांची सध्याची मोरेह शहरात तैनाती योग्य ठिकाणी नाही आणि त्यांच्यावर सहजपणे हल्ला होऊ शकतो.
बुधवारी सुरक्षा दलांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या तीन कमांडो तुकड्यांना म्यानमार सीमेजवळील शहराच्या इतर भागात स्थानांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे गुरुवारी येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना मणिपूर सरकारचे सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंह यांनी सांगितले.