मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, गोळी लगल्याने एकाचा मृत्यू; परिसरात तणाव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 01:26 PM2023-08-30T13:26:55+5:302023-08-30T13:27:43+5:30
पोलिसांनी मंगळवारी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत संघटनांशी संबंधित चार जणांना अटक करण्यात आली आहे.
मणिपूरमध्ये पुन्हा एकदा जातीय हिंसाचार भडकला आहे. येथील खोइरेंटक गावात मंगळवारी रात्री हिंसाचार उफाळून आल्याने एकाचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, काही हल्लेखोरांनी सकाळी 10 वाजताच्या सुमारास कुकी-जो गावावर हल्ला केला. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून गावातील काही लोकांनी जोरदार गोळीबार केला. यात जांगमिनलून गंगटे (३०) नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. पोलिसांनी मंगळवारी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत संघटनांशी संबंधित चार जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींची ओळख पटली असून ते एनएससीएन (आईएम) आणि पीपुल्स लिबरेशन आर्मी (पीएलए)चे एक-एक आणि इंफाळ पूर्व आणि बिष्णूपूर जिल्ह्यांतील कांगलेइपक कम्युनिस्ट पार्टी (केसीपी) (लामयांबा खुमान गट)चे दोन कार्यकर्ते आहेत.
सुरक्षा दलाने खोऱ्यातील पाच जिल्ह्यांच्या सीमावर्ती आणि संवेदनशील भागात शोध मोहीम सुरू केली आहे. 27 ऑगस्टला अज्ञात लोकांनी मणिपूरची राजधानी असलेल्या इंफाळच्या न्यू लाम्बुलाने भागात तीन घरांना आग लावली होती. मात्र अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली.
आणखी एका घटनेत काही अज्ञात लोकांनी त्याच दिवशी जवळफास 2 वाजता माजी आरोग्य आणि कुटुंब कल्यानचे संचालक के राजो यांच्या घराच्या सुरक्षेवर असलेल्या कर्मचाऱ्यांकडूनही तीन शस्त्रे हिसकावली होती. तत्पूर्वी 3 मे रोजी मणीपूरमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर, 160 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. तर शेकडो लोक जखमी झाले होते.