आंध्रात मतदानाच्या वेळी हिंसाचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 04:53 AM2019-04-12T04:53:23+5:302019-04-12T04:55:26+5:30
दोन स्थानिक नेत्यांचा झाला मृत्यू; ईव्हीएमविषयी तक्रारी; छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट
नवी दिल्ली : देशातील ९१ लोकसभा मतदारसंघांत गुरुवारी साधारणपणे शांततेने मतदान पार पडले असले तरी आंध्र प्रदेश व काश्मीरमध्ये ईव्हीएमविषयी अनेक तक्रारी आल्या. आंध्र प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी द्विवेदी यांनाच त्याचा फटका बसल्याचे आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले. आंध्रातच तेलगू देसम व वायएसआर काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमध्ये हाणामारी झाली आणि त्यात दोन जण मरण पावले, तर छत्तीसगडमध्ये दोन ठिकाणी नक्षलवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणले. मात्र सुदैवाने त्यात प्राणहानी झाली नाही.
जम्मू भागातील मतदारसंघांत भाजपच्या उमेदवाराला मतदान करा, असे सुरक्षा रक्षक मतदारांना सांगत असल्याचा व्हिडीओ ओमर अब्दुल्ला व मेहबुबा मुफ्ती यांनी सादर केला आहे. तेथील काही मतदान केंद्रांत ईव्हीएमवर हाताच्या चिन्हाचे बटण दाबले जात नसल्याच्या तक्रारी काही मतदारांनी केल्या. उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये हाताचे बटण दाबल्यावर कमळाला मत जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रे सकाळी सुरू होण्यात अडचणी आल्याने मतदानास विलंब झाला. एका ठिकाणी तर या यंत्रांच्या चाचणीच्या वेळी झालेले मतदान रद्द करण्यात आले नव्हते. त्यामुळे ते रद्द करताना नंतर ज्यांनी मतदान केले, तेही रद्द झाले.
दिल्लीजवळील, उत्तर प्रदेशच्या नॉयडा भागात पोलिसांना जी जेवणाची पाकिटे देण्यात आली, त्यावर नमो फूड्स असे छापलेले
होते. ती भाजपतर्फे देण्यात आल्याचा दावा पोलीस अधिकाऱ्यांनी केला असला तरी त्या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातील फरसगाव येथे निवडणूक कर्मचाºयांना संरक्षणात मतदान केंद्रांवर नेले जात असताना पहाटे सव्वाचार वाजता नक्षलवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला. मात्र सीआरपीएफ जवानांनी या कर्मचाºयांना अन्य मार्गाने नेल्याने प्राणहानी झाली नाही. विजापूर येथे ४ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडून तीन रायफली जप्त करण्यात आल्या.
आंध्रात विधानसभेसाठीचे मतदान सुरू असताना अनंतपूर जिल्ह्यातील मीरापूरममध्ये झालेल्या हिंसाचारात तेलुगू देसम व वायएसआर काँग्रेसचे दोन स्थानिक नेते ठार झाले. ुवायएसआर काँग्रेसचे आमदार जी. श्रीनिवास रेड्डी जखमी झाले. जन सेनेच्या एका उमेदवाराने ईव्हीएम नीट चालत नसल्याने ते जमिनीवर फेकले. त्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली.
मतदानास मज्जाव
उत्तर प्रदेशात कैराना मतदारसंघात आपणास मतदान करू दिले नाही. आपल्याऐवजी निवडणूक अधिकाºयांनीच मतदान केले, असा आरोप दोन मतदारांनी केला. त्यामुळे मतदानावर बहिष्काराचा निर्णय गावकºयांनी घेतला. त्यामुळे तिथे गोंधळ उडाला आणि तो थांबविण्यासाठी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी हवेत गोळीबार केला. या प्रकारामुळे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी तिथे जाऊ न मतदारांची समजूत घातली. त्यानंतर मतदान पूर्ववत सुरू झाले.