दिल्ली, अलिगढमध्ये ‘सीएए’वरून हिंसाचार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 03:54 AM2020-02-24T03:54:12+5:302020-02-24T03:54:31+5:30
दोन्ही ठिकाणी पोलिसांचा लाठीमार व अश्रुधूर, दोन मेट्रो स्टेशन बंद
नवी दिल्ली/अलिगढ : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएए) विरोधात सुरु असलेल्या आंदोलनास राजधानी दिल्लीत व उत्तर प्रदेशमधील अलिगढ येथे रविवारी हिंसक वळण लागले. दोन्ही ठिकाणी हाणामारी, जाळपोळ व दगडफेक झाल्याने पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. तणाव कायम असल्याने अलिगढमधील इंटरनेट सेवाही सायंकाळी बंद करण्यात आली. शाहीनबाग येथील आंदोलकांना तेथून अन्यत्र हलविण्याचे प्रयत्न सुरू असतानाच दिल्लीत जाफराबाद येथे आंदोलनाचे दुसरे केंद्र सुरू झाल्याचे दिसत आहे.
उत्तर पश्चिम दिल्लीतील मौजपूर येथे रविवारी दोन गटात दगडफेक झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. विरोध करणारे आणि समर्थन करणारे हे दोन्ही गट समोरासमोर आल्यानंतर हा प्रकार घडला.
अलिगढमध्ये कोतवाली पोलीस ठाण्याकडे जाणाऱ्या मोहम्मद अली रोडवर सुमारे ५०० महिलांनी शनिवारपासून सीएएच्या विरोधात धरणे आंदोलन सुरू केले आहे.आधीच इदगाह येथे आंदोलन सुरू असल्याने हे दुसरे आंदोलन करून रस्ता अडवू नका, असे सांगून समजूत घालण्यास गेलेल्या पोलिसांवर दगडफेक झाली व जमावाने काही वाहनांना आग लावली. भीम आर्मीचा मोर्चा अडविल्यानंतर लगेचच आंदोलनस्थळी पोलिसांवर हा हल्ला झाला. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी आधी लाठीमार व नंतर अश्रुधुराचाही वापर केला.