हिंसेची धग कायम, काश्मीरमध्ये मृतांची संख्या ३०
By Admin | Published: July 13, 2016 02:59 AM2016-07-13T02:59:47+5:302016-07-13T02:59:47+5:30
हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वनी मारला गेल्यानंतर काश्मीर खोऱ्यात घडलेल्या हिंसाचारात ठार झालेल्यांची संख्या ३० वर पोहोचली असून, हिंसक निदर्शने होण्याची शक्यता ध्यानात घेऊन
श्रीनगर : हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वनी मारला गेल्यानंतर काश्मीर खोऱ्यात घडलेल्या हिंसाचारात ठार झालेल्यांची संख्या ३० वर पोहोचली असून, हिंसक निदर्शने होण्याची शक्यता ध्यानात घेऊन त्याच्या मुकाबल्यासाठी प्रशासन सज्ज आहे. श्रीनगर शहरातील काही भाग आणि पुलवामा जिल्ह्यासह खोऱ्यातील अनेक भागांत खबरदारीचा उपाय म्हणून चौथ्या दिवशीही संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे.
गेल्या चार दिवसांपासून सुरक्षा दल आणि अतिरेक्यांत झालेल्या चकमकीने धुमसत असलेल्या काश्मीर खोऱ्यात ११५ सुरक्षा जवानांसह १३०० जण जखमी झाले आहेत. निदर्शनात जखमी झालेला आदिल अहमद मट्टू याचा सोमवारी रात्री इस्पितळात मृत्यू झाला. बिजबेहरा येथील गोळीबाराच्या घटनेत तो जखमी झाला होता, असे पोलिसांनी सांगितले.
स्थिती अधिक चिघळू नये, याची खबरदारी घेत, सय्यद अली शाह गिलानी, मीरवैझ उमर फारुक आणि मोहम्मद यासिन मलिक यांच्यासह बव्हंशी फुटीरवादी नेत्यांना एक तर ताब्यात घेण्यात आले किंवा नजरकैद करण्यात आली आहे. फुटीरवादी गटाच्या नेत्यांनी शुक्रवारी एक दिवसाचा बंद पुकारला होता. त्यानंतर, सुरक्षा दलाच्या कारवाईच्या निषेधार्थ बंदची मुदत आणखी दोन दिवस वाढविण्यात आली होती. सोमवारीही बंद पाळण्यात आला. फुटीरवादी गटांनी पुकारलेल्या बंदमुळे संपूर्ण काश्मीर खोऱ्यातील जनजीवन ठप्प होते. हिंसक निषेधाला पायबंद घालण्यासाठी श्रीनगर शहरासह काश्मीर खोऱ्यातील संवेदनशील भागात तगडा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. आजचा दिवस शांततेत पार पडल्यास, उद्या, बुधवारी सर्व दुकाने सुरू केली जातील, असे पुलवामाच्या पोलीस उपायुक्तांनी सांगितले.
दरम्यान, सोमवारी उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर भागातील एका पोलीस चौकीवर संशयित अतिरेक्यांनी हल्ला केला.
यात कोणीही जखमी नाही. अतिरेक्यांनी वारपोरा पोलीस चौकीवर पाठोपाठ बंदुकीच्या सात ते आठ फैरी झाडल्या. अन्य एका घटनेत अज्ञात हल्लेखोरांनी नूरबाग परिसरात तैैनात असलेल्या सुरक्षा दलाच्या पथकावर पेट्रोल बॉम्बने हल्ला केला. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
बान यांचे आवाहन : काश्मिरातील हिंसाचार थांबविण्यासाठी सर्व घटकांनी अधिकाधिक संयम बाळगावा, असे आवाहन संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस बान की मून यांनी केले आहे. खोऱ्यातील मनुष्यहानीबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले. या मुद्द्यावर शांततापूर्ण रीतीने तोडगा काढला जाईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
उच्चस्तरीय बैठक : पंतप्रधानांचे शांततेचे आवाहन
जम्मू-काश्मीरमधील जनतेने शांतता राखावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. कोणत्याही निर्दोष व्यक्तीला याची झळ पोहोचू नये, यासाठी राज्यातील स्थिती लवकरात लवकर पूर्वपदावर यावी, अशी अपेक्षाही त्यांनी उच्चस्तरीय बैठकीत व्यक्त केली आहे. आफ्रिकी देशांच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीची माहिती देताना पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, राज्यातील स्थितीवर चिंता व्यक्त करतानाच अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू झाल्याबद्दलही मोदींनी आनंद व्यक्त केला व राज्य सरकारला केंद्र सरकार हरप्रकारे मदत करण्यास तयार आहे, असेही सांगितले. या बैठकीस केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, जितेंद्रसिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, विदेश सचिव एस. जयशंकर आदी उपस्थित होते.
राजनाथसिंहांचा अमेरिका दौरा लांबणीवर
काश्मिरातील अशांत स्थितीमुळे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आपला अमेरिका दौरा पुढे ढकलला आहे. पुढील आठवड्यात ते भारत-अमेरिकेदरम्यानच्या सुरक्षाविषयक बोलणीसाठी दौऱ्यावर जाणार होते. १८ जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार असून, त्याचे कारण यासाठी पुढे करण्यात आले आहे.
काश्मीर हा भारताचा अंतर्गत विषय आहे, असा उल्लेख करून अमेरिकेने राज्यातील हिंसाचाराच्या घडामोडींबाबत चिंता व्यक्त केली आहे.
या समस्येचे शांततापूर्वक समाधान शोधण्यासाठी सर्व बाजू एकत्र येतील, अशी आशा आहे. हा त्या देशाचा अंतर्गत विषय असून, अमेरिकेने याबाबत भारताशी चर्चा केलेली नाही, असेही स्पष्ट केले आहे.
ओमर यांची टीका
मोदी यांनी बोलावलेल्या बैठकीला गैरहजर राहिल्याबद्दल मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्यावर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी टिष्ट्वटरवरून टीका केली. या बैठकीत राज्याचे प्रतिनिधित्व केले गेले पाहिजे होते, परंतु तसे झाले नाही, असे ओमर म्हणाले.
शांततेसाठी इमामांची मदत : राजनाथसिंह यांनी नवी दिल्लीत इमामांच्या समूहाची भेट घेऊन काश्मिरात शांतता प्रस्थापित करण्यास मदत करण्याचे आवाहन केले. खोऱ्यात शांतता निर्माण करण्यासाठी आपण मेहबुबा मुफ्ती आणि स्थानिक मौलवींची भेट घेऊ, असे आश्वासन इमामांच्या समूहाने गृहमंत्र्यांना दिले.