Delhi Violence : भाजप नेत्याने पेटवली दिल्ली; मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबाचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 03:11 PM2020-02-26T15:11:50+5:302020-02-26T15:12:13+5:30
भाजपचे नेते कपिल मिश्रा यांच्या प्रक्षोभक आवाहनानंतर ईशान्य दिल्लीत हिंसाचार भडकला असल्याचा आरोप हिंसाचारात मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबांनी केला आहे.
नवी दिल्ली : सीएए विरोधातील आंदोलनास दिल्ली येथे सोमवारी हिंसाचाराने तडा गेल्यानंतर मंगळवारी आगडोंब उसळला. या हिंसाचारात आतापर्यंत एका पोलिसासह 20 जणांचा बळी गेला आहे. तसेच 200 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तर भाजपचे नेते कपिल मिश्रा यांच्या प्रक्षोभक आवाहनानंतर ईशान्य दिल्लीत हिंसाचार भडकला असल्याचा आरोप हिंसाचारात मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबांनी केला आहे.
दिल्लीच्या हिंसाचाराच्या घटनेतील मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे. यामध्ये करावल नगर येथे दुकानातून समान आण्यासाठी गेलेल्या 26 वर्षीय राहुल सोळुंके या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर दिल्लीतील हिंसाचाराला भाजपचे नेते कपिल मिश्रा जवाबदार असल्याचा आरोप राहुलच्या वडिलांनी केला आहे.
राहुलचे वडील म्हणाले की, जर मिश्रा मौजपुरला गेले नसते तर, हिंसाचार वाढला नसता. मिश्रा यांनी मौजपुर येथे जाऊन प्रक्षोभक आवाहन केले, त्यांनतर हिंसाचाराला सुरवात झाली. त्यांनी आपल्या भाषणातून लोकांना भडकवण्याचं काम केलं. त्यामुळे दिल्लीतील सुरु असलेल्या जाळपोळीला ते जवाबदार असल्याचं ते म्हणाले.
तसेच राहुलच्या वडिलांनी सांगितले की, आपण हिंसाचार होण्याच्या एक दिवस अगोदर पोलिसांना फोन करून जाळपोळ होण्याची शक्यता असल्याची माहिती दिली होती. मात्र पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. तर एसीपी, डीसीपी यांना सुद्धा फोन केला, मात्र त्यांच्याकडूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी वेळीच हस्तक्षेप केला असता तर, माझा मुलगा मारला गेला नसता, असे म्हणत त्यांनी आपल्या अश्रुना वाट मोकळी करून दिली.