मणिपूरमध्ये हिंसाचार थांबेना, आता आंदोलकांचा केंद्रीय मंत्री आर.के. सिंह यांच्या घरावर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 08:44 AM2023-07-25T08:44:24+5:302023-07-25T08:52:32+5:30
Manipur Violence: गेल्या तीन महिन्यांपासून धुमसत असलेल्या मणिपूरमधील हिंसाचार थांबण्याचं नाव घेत नाही आहे. आता नव्याने झालेल्या हिंसाचारात केंद्रीय मंत्री आर.के. रंजन सिंह यांच्या निवासस्थानावर हल्ला करण्यात आला.
गेल्या तीन महिन्यांपासून धुमसत असलेल्या मणिपूरमधील हिंसाचार थांबण्याचं नाव घेत नाही आहे. आता नव्याने झालेल्या हिंसाचारात केंद्रीय मंत्री आर.के. रंजन सिंह यांच्या निवासस्थानावर हल्ला करण्यात आला. महिलांच्या रॅलीदरम्यान, आंदोलकांनी केंद्रीय मंत्र्यांच्या निवासस्थानावर दगडफेक केली. आर.के. रंजन सिंह यांनी हिंसाचाराने होरपळत असलेल्या मणिपूरमधील परिस्थितीबाबत संसदेत बोलावं, अशी आंदोलकांची मागणी आहे. य मुद्द्यावरून गेल्या दोन महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा आर.के. रंजन सिंह यांच्या घरावर हल्ला झाला आहे.
दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराचे पडसाद संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटत आहेत. सोमवारीदेखील संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या संदर्भात आपली प्रतिक्रिया दिली, ते म्हणाले की, 'आम्ही मणिपूर हिंसाचारावर चर्चा करण्यास तयार आहोत, पण विरोधकांना चर्चा नकोय. मी विरोधकांना विनंती करतो की, या विषयावर चर्चा होऊ द्यावी. या संवेदनशील प्रकरणातील सत्य देशाला कळणे गरजेचे आहे.' अमित शहा बोलत होते तेव्हा विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. हातात पोस्टर घेऊन घोषणाबाजीही केली.
मणिपूरमधील हिंसाचार आणि दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याच्या घटनेविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विविध क्षेत्रातील व्यक्तींकडून या घटनेचा निषेध होत आहेत. तसेच विविध संघटनांकडून मोर्चे आणि आंदोलनाच्या माध्यमातून या घटनेचा निषेध केला जात आहे.