मतदानावेळी हिंसाचार; आठ ठार
By admin | Published: April 10, 2017 04:40 AM2017-04-10T04:40:27+5:302017-04-10T04:40:27+5:30
लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी झालेल्या श्रीनगरीमध्ये मतदानावेळी जोरदार हिंसाचार झाला
श्रीनगर : लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी झालेल्या श्रीनगरीमध्ये मतदानावेळी जोरदार हिंसाचार झाला. अनेक मतदार संघांवर दगडफेक आणि पेट्रोल बॉम्ब फेकले गेले. जमावाला पांगविण्यासाठी सुरक्षा दलाने विविध भागांमध्ये केलेल्या गोळीबारात आठ जण ठार झाले आहेत. या हिंसाचारामुळे केवळ ६.५ टक्के मतदान झाले आहे.
बडगाम जिल्ह्यात चरार ए शरीफच्या पाखेरपुरा आणि बीरवाह भागात प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला. याच जिल्ह्यात चडूरा भागात एक जणाचा, तर मागम भागात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या तणावामुळे तब्बल ७० टक्के मतदान केंद्रांवरील कर्मचारी निघून गेले. या हिंसाचारामध्ये ७० ते १०० जवान जखमी झाल्याचे समजते. (वृत्तसंस्था)
मुफ्ती सरकारवर टीका
नॅशनल काँन्फरन्सचे अध्यक्ष आणि मतदारसंघातील एक उमेदवार फारुक अब्दुल्ला आणि त्यांचे पुत्र उमर अब्दुल्ला यांनी शांततेत मतदान होऊ न शकल्याबद्दल, महेबुबा मुफ्ती यांच्या सरकारवर टीका केली आहे.
पॅलेट गन नसल्याने थेट गोळीबार
मतदान केंद्रांवर तैनात करण्यात आलेल्या बीएसएफच्या जवानांना पॅलेट गन देण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांनी थेट गोळीबार केला. श्रीनगर, बडगाम आणि गंदेरबल या तीन जिल्ह्यांत दोन डझनपेक्षा अधिक जागेवर दगडफेकीच्या घटना घडल्या. या मतदारसंघात १२.६१ लाख मतदार आहेत. अनेक भागातील मतदार घराच्या बाहेरच निघाले नाहीत.