मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, मोरेह जिल्ह्यात 30 घरं-दुकानं जाळली; सुरक्षा दलांवरही गोळीबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2023 08:02 PM2023-07-26T20:02:33+5:302023-07-26T20:03:42+5:30
Manipur violence : ही घरे म्यानमार सीमेजवळील मोरेह बाजार भागातील होती. जाळपोळ झाल्यानंतर जमाव आणि सुरक्षा दलांच्या जवानांमध्ये गोळीबारही झाला.
मणिपूरमधील हिंसाचार अद्यापही थांबलेला नाही. येथील मोरेह जिल्ह्यात जमावाने बुधवारी जवळपास 30 घरे आणि दुकानांना आग लावली. यावेळी त्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबारही केला. ही रिकामी घरे म्यानमार सीमेजवळील मोरेह बाजार भागातील होती. जाळपोळ झाल्यानंतर जमाव आणि सुरक्षा दलांच्या जवानांमध्ये गोळीबारही झाला. या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे अद्याप समोर आलेले नाही, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही जाळपोळ कांगपोकपी जिल्ह्यात जमावाने सुरक्षा दलांच्या दोन बसेस जाळल्यानंतर दुसऱ्या दिवशी घडली आहे. जेव्हा बसेस मंगळवारी सायंकाळी दीमापूरवरून येत असताना, सपोरमीना येथे ही घटना घडली. यात कसल्याही प्रकारची जीवित हाणी झाल्याचे वृत्त नाही.
बसेसना लावली आग -
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक लोकांनी मणिपूरचे रजिस्ट्रेशन असलेल्या बसेसना सपोरमीनामध्ये आडवले आणि बसमध्ये दुसऱ्या समुदायाचे लोक तर नाहीत ना, हे आम्हाला बघायचे आहे, असे म्हणाले. यांपैकी काही जणांनी या बसेसना आग लावली, असेही अधिकाऱ्याने सांगितेल.