मणिपूरमध्ये उसळला हिंसाचार, विद्यार्थी धडकले थेट राजभवनावर; गोळीबारात महिला ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 08:09 AM2024-09-11T08:09:35+5:302024-09-11T08:10:10+5:30

सुरक्षा दलाबरोबरच्या झटापटीत ४० विद्यार्थी जखमी

Violence erupts in Manipur, students storm Raj Bhavan; Woman killed in firing | मणिपूरमध्ये उसळला हिंसाचार, विद्यार्थी धडकले थेट राजभवनावर; गोळीबारात महिला ठार

मणिपूरमध्ये उसळला हिंसाचार, विद्यार्थी धडकले थेट राजभवनावर; गोळीबारात महिला ठार

इम्फाळ - मणिपूरचे विद्यमान पोलिस महासंचालक व सुरक्षा सल्लागार यांना पदावरून हटविण्याच्या मागणीसाठी मंगळवारी राजभवनावर मोर्चा काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या आंदोलक विद्यार्थ्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यावेळी सुरक्षा दलाच्या जवानांशी झालेल्या झटापटीत ४० विद्यार्थी जखमी झाले आहेत. 

मणिपूरमधील कांगपोकपी जिल्ह्यामध्ये दोन सशस्त्र गटांत झालेल्या गोळीबारात एक महिला ठार झाली. येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या ड्रोन हल्ल्यांमध्ये अत्याधुनिक क्षेपणास्त्रांचा वापर झाला होता, असे तपासात आढळून आले.

राजभवनावर मंगळवारी काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये हजारो विद्यार्थी व महिला निदर्शक सामील झाले होते. या निदर्शकांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर दगडफेक केली. तसेच सरकार, सुरक्षा दलांविरोधात घोषणा दिल्या.  यावेळी सुरक्षा दलाबरोबरच्या झटापटीत जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

दिवसभरात नेमके काय काय घडले?

मणिपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी एक स्वतंत्र मोर्चा काढला होता. त्यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रतिमेचे दहन केले. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा राज्य सचिवालयाकडे वळविला. मात्र, त्यांना सुरक्षा दलाच्या जवानांनी वाटेतच अडविले. मणिपूरमध्ये बेमुदत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 

आसाम रायफल्सचे माजी महासंचालक तसेच माजी लेफ्टनंट जनरल पी. सी. नायर यांनी दावा केला होता की, मणिपूरमध्ये झालेल्या ड्रोन, अत्याधुनिक क्षेपणास्त्रांचा वापरच झालेला नाही. मणिपूर पोलिसांनी हा दावा खोडून काढताना सांगितले की, ड्रोन हल्ला झालेल्या ठिकाणी त्यात वापरलेल्या क्षेपणास्त्रांच्या शेपटीकडील भागाचे अवशेष सापडले आहेत. नायर यांनी केलेला दावा ही आसाम रायफल्सची नव्हे, तर त्यांची वैयक्तिक मते आहेत. हल्ला करण्यासाठी वापरलेली ड्रोनही घटनास्थळी मिळाली आहेत. 

पाच दिवस इंटरनेट बंद

मणिपूरच्या इम्फाळ पश्चिम, इम्फाळ पूर्व, थौबल, बिष्णुपूर आणि काक्चिंग या पाच जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय तेथील राज्य सरकारने मंगळवारी घेतला. विद्यार्थ्यांची निदर्शने व हिंसक घटनांमुळे सरकारने हे पाऊल उचलले आहे. याआधी संपूर्ण मणिपूरमध्ये इंटरनेट सेवा पाच दिवस बंद ठेवण्याचे राज्य सरकारने ठरविले होते, पण नंतर आदेशात सुधारणा करण्यात आली. 

सीआरपीएफचे आणखी दोन हजार जवान तैनात

मणिपूरमध्ये पुन्हा उसळलेला हिंसाचार लक्षात घेता केंद्र सरकारने सीआरपीएफच्या आणखी दोन बटालियनमधील सुमारे दोन हजार जवानांना तैनात केले आहे. तेलंगणातील वारंगळ येथून सीआरपीएफची ५८ क्रमांकाची बटालियन व झारखंडमधून ११२ क्रमांकाच्या सीआरपीएफ बटालियनला तातडीने मणिपूरमध्ये हलविण्यात आले आहे.   

Web Title: Violence erupts in Manipur, students storm Raj Bhavan; Woman killed in firing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.