हरियाणात हिंसाचार सुरूच

By Admin | Published: February 21, 2016 03:46 AM2016-02-21T03:46:42+5:302016-02-21T03:46:42+5:30

जाट आंदोलन चिघळल्यामुळे हरियाणात उफाळलेला हिंसाचार शमला नसून शनिवारी हिंसाचाराच्या अनेक घटना समोर आल्या. झज्जर आणि रोहतकमध्ये हिंसक जमावाला पांगविण्यासाठी

Violence in Haryana continues | हरियाणात हिंसाचार सुरूच

हरियाणात हिंसाचार सुरूच

googlenewsNext

चंदीगड : जाट आंदोलन चिघळल्यामुळे हरियाणात उफाळलेला हिंसाचार शमला नसून शनिवारी हिंसाचाराच्या अनेक घटना समोर आल्या. झज्जर आणि रोहतकमध्ये हिंसक जमावाला पांगविण्यासाठी सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात ५ जण ठार झाले आहेत. त्यामुळे कालपासून आंदोलनात मरण पावलेल्यांची संख्या ८ झाली आहे.
आंदोलनकर्त्यांनी जिंदमध्ये एका रेल्वे स्थानकाला आग लावली; तर लष्कराने संचारबंदी लागू असलेल्या दोन जिल्ह्यांत ध्वजसंचलन केले. रोहतक जिल्ह्यात आंदोलकांनी रस्तेच खणून ठेवल्यामुळे लष्कराला हेलिकॉप्टरद्वारे तिथे धाडले. आंदोलनकर्त्यांनी दिल्ली-रोहतक आणि फजिलका महामार्गावर चक्काजाम केल्याने तिथेही हवाईमार्गे जवानांची कुमक येथे पोहोचविण्यात आली. न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करून, जाट समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देणे शक्य असल्यास आपण निश्चितच तो निर्णय घेउ, असे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आज पुन्हा सांगितले. त्यांनी आंदोलकांना हिंसक मार्गाचा अवलंब न करण्याचे आवाहनही केले. मात्र त्यांच्या या घोषणेने आंदोलकांचे समाधान झालेले नाही. परिणामी आंदोलन लगेचच शांत होण्याची लक्षणे नाहीत. सरकारने शाळा आणि महाविद्यालयांना २२ फेब्रुवारीपर्यंत सुटी जाहीर केली आहे.
काही ठिकाणी जाळपोळ तर काही ठिकाणी संचारबंदी यांमुळे रस्ते व रेल्वे वाहतूक बंदच झाली आहे. त्यामुळे नोकरदार तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांनी प्रवास करणाऱ्यांचे हाल सुरू आहेत. मुंबई आणि महाराष्ट्रातून हरयाणामार्गे दिल्ली, पंजाब, जम्मूकडे जाणाऱ्या गाड्या एक तर रद्द करण्यात आल्या आहेत वा निघालेल्या गाड्या मध्येच थांबवण्यात आल्या आहेत. दिल्लीहून हरयाणात वा तेथून दिल्लीकडे रोज नोकरी, उद्योगासाठी येणाऱ्या मंडळींचे तर प्रचंड हाल होत आहेत. मारुती कंपनीने कारखाना बंद करून, कारचे उत्पादन थांबवले आहे. काही अज्ञात व्यक्तींनी सकाळी जिंद जिल्ह्यातील बुढाखेडा रेल्वेस्टेशनला आग लावली. या आगीत येथील फर्निचर, रेकॉर्ड रुम आणि इतर सामान जळून खाक झाले. प्रशासनाने दिसताक्षणी गोळी मारण्याचे आदेश दिल्यावरही रात्रभर अनेक जिल्ह्यात हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना सुरूच होत्या. हिसार, झज्जर, जिंद, कैथल आणि पानिपतमध्ये याची तीव्रता अधिक आहे.
जाट आंदोलनकर्त्यांनी अनेक ठिकाणी रस्ते खोदून वाहतूक ठप्प पाडली आहे. लष्कराच्या एका ताफ्याला रस्ता खोदला असल्याने मदनखेरी गावाजवळच थांबावे लागले. राज्याच्या अनेक भागांत हिंसाचार सुरूच असून रोहतक, भिवानी, झज्जर आणि गुरगावमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रोहतक आणि भिवानीमध्ये लष्कराने ध्वजसंचलन केले. राज्यात लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्याला सरकारचे प्राधान्य असून यासाठी आवश्यक ती कारवाई केली जाईल,असे पोलीस महासंचालक यशपाल सिंघल यांनी पत्रपरिषदेत सांगितले.

पोलीस ठाणे आणि पेट्रोल पंप जाळला
रोहतक येथून प्राप्त वृत्तानुसार जिल्ह्यातील मेहम गावात सुमारे दोन ते अडीच हजार लोकांच्या हिंसक जमावाने पोलीस ठाणे, पेट्रोल पंप आणि शासकीय इमारतींना आग लावली. भाजपच्या खासदाराचे घर जाळण्याचाही प्रयत्न आंदोलकांनी केला. हिसारमध्ये एक मॉल पेटवण्याचे प्रयत्न हिंसक जमावाने शुक्रवारी रात्री केले.

खट्टर यांच्या निवासस्थानी तातडीची बैठक
मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आंदोलन मागे घेऊन राज्यात शांतता आणि कायदा-व्यवस्था कायम राखण्याचे तसेच सरकारी मालमत्तेचे नुकसान न करण्याचे आवाहन केले आहे. आंदोलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यास मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी तातडीची बैठक घेण्यात आली.

जातीच्या आधारे फूट पाडण्याचा भाजपा, संघाचा डाव : काँग्रेसचा आरोप
हिंसक आंदोलनासाठी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असून, जातीच्या आधारे राज्यात फूट पाडण्याचा हा डाव असल्याचा आरोप काँग्रेसने केला. पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकांना शांतता राखण्याचे आणि चर्चेतून तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे. काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी हरियाणावासीयांना राज्याच्या हितासाठी आंदोलन मागे घेण्याची विनंती शनिवारी केली.

दिल्लीत पाण्याची चिंता
दिल्लीला ६0 टक्के पाणीपुरवठा करणाऱ्या मुनक कालव्यावरही आंदोलकांनी कब्जा प्रस्थापित केल्यामुळे अवघे दिल्ली शहर चिंतित असून, मुख्यमंत्री केजरीवालांनी याबाबत केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंहांकडे त्वरित हस्तक्षेपाची मागणी केली आहे.

जाट आरक्षण आंदोलनामुळे रेल्वेला दररोज 200कोटींचे नुकसान सोसावे लागतेय. ७१६ ट्रेन्सवर या आंदोलनाचा विपरीत परिणाम झाला असून,
450 पेक्षा अधिक ट्रेन्स रद्द केल्या आहेत.

(लोकमत न्यूज नेटवर्क /वृत्तसंस्था)

 

Web Title: Violence in Haryana continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.