जगात हिंसेला अजिबात स्थान नाही; भारताच्या तटस्थतेचा सोनिया गांधींनी केला तीव्र निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 12:06 PM2023-10-31T12:06:26+5:302023-10-31T12:06:50+5:30

इस्रायलने गाझाला ‘जेल’ बनवले; उद्ध्वस्त गाझामध्ये नागरिकांचे हाल-बेहाल

Violence has no place in the world; Sonia Gandhi strongly condemned India's neutrality | जगात हिंसेला अजिबात स्थान नाही; भारताच्या तटस्थतेचा सोनिया गांधींनी केला तीव्र निषेध

जगात हिंसेला अजिबात स्थान नाही; भारताच्या तटस्थतेचा सोनिया गांधींनी केला तीव्र निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : हमासने इस्रायलवर ७ ऑक्टोबर रोजी केलेला हल्ला हा क्रूरच होता. परंतु त्यानंतर इस्रायली लष्कराकडून सातत्याने सुरू असलेल्या हल्ल्यात हजारो निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे.  इस्रायलने गाझाला जेल बनविले आहे. सुसंस्कृत जगात हिंसेला अजिबात स्थान नाही, असे सांगत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी संयुक्त राष्ट्रात भारत सरकारच्या तटस्थ भूमिकेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत असल्याचे म्हटले. एका वृत्तपत्रातील लेखात त्यांनी ही भूमिका विषद केली.

हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलकडून गाझातील निष्पाप मुले, महिला, वृद्धांचा विचार न करताही हल्ले थांबत नाहीत. या लोकांचा हमासशी काहीही संबंध नाही, तरी त्यांचा बळी का घेतला जात आहे, असा सवालही सोनिया गांधी यांनी उपस्थित केला.

इस्रायलची भूमिका अमानवी

इस्रायलच्या हल्ल्यामध्ये हजारो लोकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. शहरांचे रूपांतर इमारतींच्या ढिगाऱ्यात झाले. नाकाबंदी करून गाझातील लोकांना अन्न, पाणी, वीज तसेच अत्यावश्यक वस्तूंपासून वंचित ठेवणे हे अमानवीच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय कायद्यांचेही उल्लंघन करणारे आहे. निष्पाप लोकांचा भूकेविना बळी जाणे हे सुसंस्कृत जगाचे लक्षण नसल्याचेही सोनिया गांधी यांनी आपल्या लेखात नमूद केले आहे. 

हमासने जारी केला ओलिसांचा व्हिडीओ

  • पॅलेस्टाइनमधील दहशतवादी संघटना हमासने ओलिस ठेवलेल्य इस्रायलच्या तीन महिलांचा व्हिडीओ जारी केला. 
  • ७ ऑक्टोबरला हमासने त्यांना इस्रायलमधून ताब्यात घेतले होते. nहमासकडे २४० इस्रायली नागरिक ओलिस असून त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू आहे.


दोन्ही देशांना शांततेचा अधिकार

पॅलेस्टाइन आणि इस्रायल या दोघांनाही शांततेच्या वातावरणात जगण्याचा अधिकार आहे. त्यावर काँग्रेसचा ठाम विश्वास आहे. इस्रायलसोबत असलेल्या भारताच्या मैत्रीला आम्ही महत्त्व देतोच. पण, त्यांनी पॅलेस्टिनी नागरिकांना  त्यांच्याच जन्मभूमीत बाहेर काढणे चुकीचे असल्याचे गांधी म्हणाल्या.

काँग्रेसची भूमिका राजकीय : भाजप

युद्धावर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मांडलेली भूमिका ही राजकीय असल्याची टीका भाजपने केली. ही भूमिका हमासचे अप्रत्यक्ष समर्थन करणारी आहे. त्यातून भारताच्या सुरक्षा आणि हितसंबंधांवर परिणाम करू शकतो, असे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी म्हणाले.

घरे उद्ध्वस्त, आता रुग्णालये लक्ष्य

खान युनिस (गाझा पट्टी) : इस्रायली लष्काराने गाझा पट्टीत प्रवेश केल्यानंतर त्यांच्याकडून आता अंतर्गत भागात हल्ले केले जात आहेत. एवढेच नव्हे, तर घरे उद्ध्वस्त झाल्याने हजारो नागरिकांनी आश्रय घेतलेल्या रुग्णालयांनाही लक्ष्य केले जात आहे. हजारो रुग्ण व कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त जवळपास १, १७ हजार नागरिक गाझातील विविध रुग्णालयांत आश्रय घेत असल्याचे संयुक्त राष्ट्राच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

३३ ट्रक मदत दाखल

  • युद्धाने पीडित असलेल्या गाझा पट्टीत खाद्यसामग्री, औषधे आणि जीवनावश्यक वस्तू घेऊन आलेले ३३ ट्रक इजिप्तमधून दाखल झाले. 
  • युद्ध सुरू झाल्यानंतरची ही सर्वांत मोठी मदत असली, तरी गरजेपेक्षा अपुरी असल्याचे म्हटले जात आहे.
  • मदत घेऊन आलेले आणखी ७५ ट्रक इजिप्त सीमेवर दाखल असून परवानगी मिळाल्यानंतर ते गाझामध्ये प्रवेश करतील.


'त्या' जर्मन महिलेचा मिळाला मृतदेह

  • हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबरला केलेल्या हल्ल्यानंतर ओलिस म्हणून नेलेल्या जर्मनीच्या २३ वर्षीय शानी लौक हिचा मृत्यू झाल्याचे समोर आले.
  • इस्रायली सैनिकांना गाझामध्ये तिचा मृतहेद आढळल्यानंतर तिच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आली.
  • म्युझिक फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालेल्या शानी हिला ताब्यात घेतल्यानंतर हमासच्या दशतवाद्यांनी तिची नग्न धिंड काढली होती.


गाझा पट्टीतील आकडेवारी

  • ८,३०६- गाझातील मृत्यू
  • ३,४५७- बालकांचा मृत्यू
  • २१,०४८- जखमींची संख्या
  • १,४००- इस्रायलींचा मृत्यू

Web Title: Violence has no place in the world; Sonia Gandhi strongly condemned India's neutrality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.