हरयाणात हिंसाचार थांबेना; प्रदीप शर्मा हत्येप्रकरणी आप नेत्यासह १५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 05:22 AM2023-08-07T05:22:51+5:302023-08-07T05:23:04+5:30
- बलवंत तक्षक लोकमत न्यूज नेटवर्क चंडीगड : हरयाणातील नूह येथे झालेल्या हिंसाचारात बादशाहपूर येथील बजरंग दलाचे संयोजक प्रदीप शर्मा ...
- बलवंत तक्षक
लोकमत न्यूज नेटवर्क
चंडीगड : हरयाणातील नूह येथे झालेल्या हिंसाचारात बादशाहपूर येथील बजरंग दलाचे संयोजक प्रदीप शर्मा यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी आम आदमी पार्टीचे (आप) नेते जावेद अहमद यांच्यासह सुमारे १५० जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, हरयाणात हिंसाचार सुरूच असून, पानिपतमध्ये दुकानांची तोडफोड करण्यात आली.
आपल्या तक्रारीत पवन याने म्हटले आहे की, जावेदने जमावाला सांगितले की, त्यांना मारा. जे होईल ते मी पाहून घेईन.
या हल्ल्यात प्रदीप यांना रॉड लागला आणि ते जखमी होऊन खाली पडले. गोळीबाराचा आवाज ऐकून पोलिस तेथे पोहोचले. प्रदीप यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. जावेद त्या दिवशी घटनास्थळी उपस्थित नव्हता, असे काही लोकांचे म्हणणे आहे. दरम्यान, नूहमध्ये अजूनही संचारबंदी आहे, सरकारने इंटरनेटसेवा, बल्क एसएमएस सेवा ८ ऑगस्टपर्यंत बंद ठेवल्या आहेत.
दंगलीचे पाकिस्तानी कनेक्शन?
n नूह दंगलीचे पाकिस्तानी कनेक्शनही समोर आले आहे. तपासादरम्यान, पोलिसांना पाकिस्तानी यूट्यूबर जीशान मुश्ताकची माहिती मिळाली आहे, ज्याने ‘अहसान मेवाती’ या नावाने सोशल मीडियावर आपले खाते तयार केले होते. त्याने नूह हिंसाचाराच्या वेळी प्रक्षोभक व्हिडीओ पोस्ट केले.
n हे लोकेशन राजस्थानातील अलवरचे सांगितले जाते. मात्र, हे व्हिडीओ पाकच्या इस्लामाबाद, लाहोर येथून अपलोड करण्यात आले होते. मोनू मानेसरला मारणे आणि नूह येथील हिंसाचाराला जीशाननेच प्रवृत्त केले होते. पोलिसांनी जीशानविरुद्ध गुन्हा
दाखल करण्याची तयारी केली आहे.
बिट्टू बजरंगीला अटक
नूह येथे हिंसाचार भडकविल्याच्या आरोपावरून पोलिसांनी गोरक्षक बिट्टू बजरंगीला अटक केली आहे. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी बजरंगीविरुद्ध फरिदाबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अटक झाल्यानंतर, लगेचच बजरंगीला जामिनावर सोडण्यात आले होते.
खट्टर, विज यांच्यात तणाव
हिंसाचारानंतर मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आणि गृहमंत्री अनिल विज यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाला आहे. नूह दंगलीसंदर्भात कोणताही प्रश्न विचारला असता, विज यांनी स्पष्टपणे सांगितले की, तुम्हाला जे विचारायचे आहे, ते मुख्यमंत्र्यांनाच विचारा. त्यांच्याकडे सर्व माहिती आहे.
पानिपतमध्ये दुकानांची तोडफोड
हरयाणाच्या पानिपतमध्ये रविवारी चेहरा झाकून दुचाकीवरून आलेल्या पुरुषांच्या गटाने दोन ठिकाणी काही दुकानांची तोडफोड केली. यात काही लोक जखमी झाले. यासंदर्भात १५ जणांना ताब्यात घेण्यात आहे.
आमदाराची सुरक्षा काढून घेतली
हिंसाचारानंतर खट्टर सरकारने फिरोजपूर-झिरका येथील काँग्रेस आमदार मामन खान यांची सुरक्षा काढून घेतली आहे. नूह येथील हिंसाचारात खान यांचेही नाव जोडले जात आहे. नूह येथील हिंसाचारासाठी मामन खान यांच्या विधानसभेतील भाषणाला जबाबदार धरले जात आहे.