मणिपूरमधील हिंसा थांबेना शाळेबाहेर महिलेची हत्या; पुन्हा एकदा इंटरनेटवर घातली बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 08:00 AM2023-07-07T08:00:16+5:302023-07-07T08:00:25+5:30
इन्फाळ : मणिपूरमधील हिंसाचार ६० दिवसांनंतरही थांबण्याचे नाव घेताना दिसून येत नाही. बुधवारी प्रशासनाने शाळा सुरू केल्यानंतर गुरुवारी इन्फाळच्या ...
इन्फाळ : मणिपूरमधील हिंसाचार ६० दिवसांनंतरही थांबण्याचे नाव घेताना दिसून येत नाही. बुधवारी प्रशासनाने शाळा सुरू केल्यानंतर गुरुवारी इन्फाळच्या पश्चिम जिल्ह्यात गुरुवारी एका शाळेबाहेर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी एका महिलेची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर परिस्थिती बिघडल्यामुळे पुन्हा एकदा इंटरनेटवर बंदी घालण्यात आली आहे.
ही घटना लम्फेल पोलिस स्टेशन अंतर्गत क्वाकिथेल मायाई कोईबी येथे घडली. हत्येच्या घटनेनंतर जवळपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात तणव निर्माण झाला होता. अतिरिक्त सुरक्षा दल या भागात पोहोचू नये म्हणून सुमारे १ हजार ते १,५०० महिलांनी रस्ते रोखून धरले होते. मात्र, परिसरात आसाम रायफल्सच्या जवानांच्या तैनातीमुळे परिस्थिती नियंत्रणात आली.
सर्व जण ‘योद्धा’च्या पोशाखात
चुराचांदपूरमध्ये मोठ्या संख्येने कुकी समुदायाच्या लोकांनी आंदोलन केले. त्यांनी शांती मैदानापर्यंत रॅली काढली. यामध्ये जवळपास ४ हजार लोक सहभागी झाले होते. यातील बहुतेक सर्व जण ‘योद्धा’च्या पोशाखात होते. तसेच कमांडोप्रमाणे चेहरा रंगवला होता.
विरोधी सदस्यांचा बैठकीतून सभात्याग
मणिपूरवर चर्चेची मागणी संसदेच्या गृह व्यवहारविषयक स्थायी समितीच्या अध्यक्षांनी फेटाळल्यानंतर विरोधी सदस्य बैठकीतून बाहेर पडले. ही सरकारची नैतिक आणि घटनात्मक जबाबदारी असल्याचे सदस्य म्हणाले.