मेघालयात हिंसाचार; बेकायदा लाकूड वाहतूक रोखल्याने तणाव; पोलिस गोळीबारात ६ ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 06:31 AM2022-11-23T06:31:27+5:302022-11-23T06:31:50+5:30

आसाम वनविभागाच्या पथकाने पहाटे ३ च्या सुमारास मेघालयातील पश्चिम जैंतिया हिल्स जिल्ह्याच्या दिशेने बेकायदा लाकूड घेऊन जाणारा ट्रक अडविला, असे पश्चिम कार्बी आंगलाँगचे पोलिस अधीक्षक इमदाद अली यांनी सांगितले.

Violence in Meghalaya; Tensions from curbing illegal timber traffic; 6 killed in police firing | मेघालयात हिंसाचार; बेकायदा लाकूड वाहतूक रोखल्याने तणाव; पोलिस गोळीबारात ६ ठार

मेघालयात हिंसाचार; बेकायदा लाकूड वाहतूक रोखल्याने तणाव; पोलिस गोळीबारात ६ ठार

Next

गुवाहाटी : आसाम-मेघालय सीमेवर पश्चिम कार्बी आंगलाँग जिल्ह्यात मंगळवारी पहाटे बेकायदा लाकूड वाहतूक करणारा ट्रक अडविल्यानंतर पोलिसांच्या गोळीबारात आणि हिंसाचारात वनरक्षकासह सहा जण ठार झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.  या घटनेनंतर आसामपोलिसांनी मेघालयच्या सीमेवर असलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये संभाव्य कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती रोखण्यासाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे, असे आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, या घटनेचे वृत्त सोशल मीडियावर पसरताच, मेघालयातील ७ जिल्ह्यांत हिंसाचार उफाळला असून, ४८ तासांसाठी इंटरनेट बंद करण्यात आले आहे.

आसाम वनविभागाच्या पथकाने पहाटे ३ च्या सुमारास मेघालयातील पश्चिम जैंतिया हिल्स जिल्ह्याच्या दिशेने बेकायदा लाकूड घेऊन जाणारा ट्रक अडविला, असे पश्चिम कार्बी आंगलाँगचे पोलिस अधीक्षक इमदाद अली यांनी सांगितले.

७ जिल्ह्यांत तणाव; कुटुंबीयांप्रति शोक व्यक्त
- हिंसाचारानंतर मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांच्या आदेशानुसार, या जिल्ह्यांमध्ये ४८ तासांसाठी इंटरनेट बंद करण्यात आले आहे.

- यामध्ये पश्चिम जैंतिया हिल्स, ईस्ट जैंतिया हिल्स, ईस्ट खासी हिल्स, रि-भोई, ईस्ट वेस्ट खासी हिल्स, वेस्ट खासी हिल्स आणि दक्षिण पश्चिम खासी हिल्स यांचा समावेश आहे.

- मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रति शोक व्यक्त केला आणि घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. मेघालय पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.

शस्त्रे घेऊन जमाव घटनास्थळी दाखल
संशयितांनी ट्रकमधून पळून जाण्याचा प्रयत्न करताच, वनरक्षकांनी त्यावर गोळीबार केला. त्यामुळे ट्रकचा एक टायर फुटला. त्यानंतर, वाहनाचा चालक आणि क्लीनरसह अन्य एका व्यक्तीला पकडण्यात आले, परंतु इतर जण पळून जाण्यात यशस्वी झाले, असे त्यांनी सांगितले. वनरक्षकांनी झिरकेंडिंग पोलिस ठाण्यात संपर्क साधल्यानंतर पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. दरम्यान, पहाटे ५ च्या सुमारास मेघालयातील नागरिकांचा जमाव मोठ्या संख्येने खंजीर (डाओस) आणि इतर शस्त्रे घेऊन घटनास्थळी जमा झाला होता.

पोलिसांवर हल्ला
अटक केलेल्यांची तत्काळ सुटका करण्याची मागणी करणाऱ्या जमावाने पोलिसांना घेराव घातला व त्यांच्यावर हल्ला केला. पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गोळीबार करावा लागला, असे अली म्हणाले. या घटनेत एक वनसंरक्षक आणि मेघालयातील खासी समुदायाचे पाच लोक ठार झाले. स्थिती आता नियंत्रणात आहे, जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी दुर्गम भागात सुरक्षाव्यवस्था मजबूत करत आहेत. 
 

Web Title: Violence in Meghalaya; Tensions from curbing illegal timber traffic; 6 killed in police firing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.