मतदानादरम्यान बंगालमध्ये हिंसाचार, केंद्रीय मंत्र्यांच्या घराजवळ सापडला बॉम्ब, दगडफेकीत भाजपा कार्यकर्ता जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 12:12 PM2024-04-19T12:12:07+5:302024-04-19T12:12:24+5:30
West Bengal Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनलेल्या पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये तीन लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. मात्र मतदानाला सुरुवात होताच बंगालमध्ये हिंसाचाराला तोंड फुटलं आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनलेल्या पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये तीन लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. मात्र मतदानाला सुरुवात होताच बंगालमध्ये हिंसाचाराला तोंड फुटलं आहे.
पश्चिम बंगालमधील कूचबिहार लोकसभा मतदारसंघात चंदामारी येथे मतदान केंद्रासमोर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. चंदामारी येथे मतदारांना मतदान करण्यापासून रोखण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून ही दगडफेक करण्यात आली, असा आरोप भाजपाने केला आहे. तसेच या दगडफेकीमध्ये भाजपाचा एक पोलिंग एजंट हा जखमी झाला आहे. तसेच केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते निशित प्रामाणिक यांच्या घराजवळ बॉम्ब सापडला. हा बॉम्ब पोलिसांनी हटवला आहे.
पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या ४२ जागा असून, येथे ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस पक्ष आणि भाजपा यांच्यात मुख्य लढत होणार आहे. तर काँग्रेस आणि डावे पक्ष हे या दोघांनाही आव्हान देतील. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने २३, भाजपाने १८ तर काँग्रेसने १ जागा जिंकली होती. त्यामुळे यावेळी बंगालची जनता काय कौल देणार याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे.