धर्माच्या नावाने हिंसाचार कदापि चालू देणार नाही, पंतप्रधान मोदींनी दिला इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 06:51 AM2017-08-28T06:51:00+5:302017-08-28T06:54:51+5:30
नवी दिल्ली : धर्माच्या नावाने हिंसाचार बिलकूल खपवून घेतला जाणार नाही. कायदा हाती घेणाºयांची गय केली जाणार नाही, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.
डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम यांना हरियाणा येथील पंचकुला येथील न्यायालयाने आश्रमातील एका महिला साध्वीवर बलात्कार केल्याच्या खटल्यात दोषी ठरविल्यानंतर त्या पंथाच्या अनुयायांनी केलेल्या हिंसाचारात ३६ जण ठार झाले होते. त्यानंतर पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने ‘पंतप्रधान भाजपाचे नव्हेत तर देशाचे आहेत व मुख्यमंत्रीही पक्षाचे नसून हरियाणा राज्याचे आहेत,’ असे जळजळीत भाष्य केले होते.
मोदी यांनी ३५ व्या ‘मन की बात’मध्ये याची विशेष दखल घेऊन वरीलप्रमाणे ग्वाही दिली. प्रत्येकाला कायद्यापुढे झुकावेच लागेल. दोषी कोण हे कायदा ठरवेल व जे कोणी दोषी ठरेल त्याला शिक्षा अवश्य होईल, असे त्यांनी सांगितले.
तयार भाषणात सुधारणा?
पंचकुला येथील हिंसाचार शुक्रवार दुपारनंतर झाला. त्यावर पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांवर उच्च न्यायालयाने शनिवारी ताशेरे ओढले. माहीतगार सूत्रांनुसार तोपर्यंत मोदींच्या ‘मन की बात’चे रेकॉर्डिंंग झालेले होते. प्रसारणापूर्वी तातडीने पुन्हा रेकॉर्डिंग करून हरियाणातील घटनांचा संदर्भ व त्याचा धिक्कार करणारा पहिला परिच्छेद नव्याने समाविष्ट केला गेला.
अहिंसा परमो धर्म:
भिन्न धर्मांचे उत्सव सुरू असताना देशाच्या एका भागातून हिंसाचाराच्या येणाºया बातम्या हा देशासाठी साहजिकच चिंतेचा विषय आहे, असे नमूद करून मोदी म्हणाले की, पूर्वजांनी शेकडो वर्षे सार्वजनिक जीवनमूल्यांचा व अहिंसेचा आदरपूर्वक स्वीकार केला. तो विचार आपल्या नसानसांत भिनलेला आहे. ‘अहिंसा परमो धर्म:’
हे आपण ऐकत, सांगत आलो आहोत.
कायदा हाती घेऊ नका
स्वातंत्र्य दिनाच्या भाषणाचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, श्रद्धेच्या नावाने हिंसा सहन केली जाणार नाही, हे मी त्याही वेळी सांगितले होते. मग ती श्रद्धा धर्माविषयी असो, राजकीय विचारसरणीची असो, व्यक्तीसंबंधी किंवा परंपरांविषयी आस्था असो. श्रद्धेच्या नावाखाली कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही व तसे कोेणालाही करू दिले जाणार नाही.