प्रजासत्ताकदिनी झालेला हिंसाचार, राष्ट्रध्वजाचा अपमान अतिशय दुर्भाग्यपूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 04:17 AM2021-01-30T04:17:52+5:302021-01-30T06:31:02+5:30

राष्ट्रपतींनी व्यक्त केली खंत; नवीन कृषी कायद्यांचे केले समर्थन

Violence on Republic Day, insult to national flag is very unfortunate | प्रजासत्ताकदिनी झालेला हिंसाचार, राष्ट्रध्वजाचा अपमान अतिशय दुर्भाग्यपूर्ण

प्रजासत्ताकदिनी झालेला हिंसाचार, राष्ट्रध्वजाचा अपमान अतिशय दुर्भाग्यपूर्ण

googlenewsNext

नवी दिल्ली : प्रजासत्ताकदिनी दिल्लीत झालेला हिंसाचार तसेच तिरंगा राष्ट्रध्वजाचा करण्यात आलेला घोर अपमान ही अतिशय दुर्भाग्यपूर्ण घटना आहे, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रारंभी केलेल्या अभिभाषणात शुक्रवारी म्हटले आहे. नवीन तीन कृषी कायद्यांचे राष्ट्रपतींनी जोरदार समर्थन केले.

ते म्हणाले की, नवीन तीन कृषी कायद्यांमुळे १० कोटी छोट्या शेतकऱ्यांना त्वरित फायदे मिळाले आहेत. या कायद्यांना विविध राजकीय पक्षांनी याआधी पाठिंबाच दिला होता. दिल्लीमध्ये प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चामध्ये जो हिंसाचार झाला, त्याचे समर्थनच होऊ शकत नाही. राज्यघटनेने आपल्याला विचारस्वातंत्र्य दिले आहे; मात्र कायदे व नियमांचे प्रत्येकाने पालन केलेच पाहिजे, हेही राज्यघटनेने सांगितले आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सुमारे २० विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला होता. नवीन तीन कृषी कायदे रद्द करा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी चालविलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षांनी ही कृती केली. काँग्रेसचे खासदार रवनीतसिंग बिट्टू यांनी राष्ट्रपतींचे अभिभाषण सुरू असताना सभागृहात जय जवान जय किसान, अशी घोषणा दिली व नवे कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली. 

‘कृषी व्यवस्थांना धक्का लागलेला नाही’
राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने नव्या कृषी कायद्यांना स्थगिती दिली असून, न्यायालय जो निर्णय घेईल त्याचा सरकार आदरच करेल. नव्या कृषी कायद्यांच्या आधीपासून प्रचलित असलेल्या कोणत्याही कृषी व्यवस्थांना या कायद्यांमुळे धक्का लागलेला नाही, हेही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आवर्जून सांगितले.

Web Title: Violence on Republic Day, insult to national flag is very unfortunate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.