मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, जमावाला पांगवण्यासाठी लष्कराकडून अश्रुधुराचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2023 06:54 AM2023-05-23T06:54:20+5:302023-05-23T06:54:35+5:30
सोमवारी सकाळी दहा वाजता न्यू लम्बुलेनच्या स्थानिक बाजारपेठेत मैतेई आणि कुकी समुदायात वाद झाला.
इम्फाळ : मणिपूरमधील ताज्या हिंसाचारात सोमवारी दुपारी जमावाने इम्फाळ पूर्व जिल्ह्यात दोन घरे जाळली. पोलिसांनी सांगितले की, सोमवारी दुपारी दोन सशस्त्र लोकांनी व्यापाऱ्यांना जबरदस्तीने दुकाने बंद करण्यास भाग पाडले. जमावाने एकाला बेदम मारहाण केली, तर दुसरा पळून जाण्यात यशस्वी झाला. या घटनेनंतर दोघांना ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळी दाखल लष्कराच्या जवानांनी जमावाला पांगवण्यासाठी बळाचा वापर केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
सूत्रांनी सांगितले की, सोमवारी सकाळी दहा वाजता न्यू लम्बुलेनच्या स्थानिक बाजारपेठेत मैतेई आणि कुकी समुदायात वाद झाला. त्याचे पर्यवसान जाळपोळीत झाले. जमावाने काही घरांना आग लावली. यात काही लोक किरकोळ जखमी झाले. या घटनेनंतर इम्फाळ पूर्व जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पोलिसांनी काही लोकांना पकडले असून, त्यांच्याकडून शस्त्र जप्त करण्यात आली आहेत. (वृत्तसंस्था)
१८ दिवसांनंतर पुन्हा हिंसाचार
मणिपूर शांत होत असतानाच पुन्हा जाळपोळ सुरू झाली आहे. मणिपूरमध्ये हिंसाचारामुळे दहा हजार लोक विस्थापित झाले आहेत. या हिंसाचारात आतापर्यंत ७४ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर २३० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. आतापर्यंत १७०० घरे जाळण्यात आली आहेत. राज्यात ३ मेपासून हिंसाचार सुरू आहे. मध्यंतरी तो थांबला होता.
काय आहे प्रकरण?
n मणिपूरमध्ये ३८ लाख लोकसंख्येत अर्ध्याहून अधिक मैतेई समुदाय आहे. या समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याची मागणी आहे. त्यासाठी ३ मे रोजी ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियनने मणिपूरमध्ये एक रॅली काढली होती. त्यानंतर हिंसाचार उसळला.
n आपली सांस्कृतिक ओळख कायम ठेवण्यासाठी हा समुदाय आरक्षण मागत आहे. मात्र, नागा आणि कुकी जमातींचा याला विरोध आहे. नागा आणि कुकी यांची लोकसंख्या ३४ टक्के आहे.