पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरूच; दोन भाजपा कार्यकर्त्यांची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 09:55 PM2019-06-22T21:55:24+5:302019-06-22T21:55:47+5:30
आरोपांचे तृणमूल काँग्रेसने खंडन केले असून पोलिसांनुसार नजीमुलचा मृत्यू दारुड्यांनी केलेल्या मारहाणीत झाला आहे.
कोलकाता : लोकसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसाचार सुरूच असून कार्यकर्त्यांच्याही हत्या केल्या जात आहेत. उत्तर परगना जिल्ह्यातील आमडांगामध्ये दोघांची हत्या करण्यात आली आहे.
मृतांचे नाव नजीमुल करीम उर्फ अकबर अली मंडल (23) आणि गोपाल पाल (50) असे आहे. नजीमुल आमडांगामधील बईचगाछीचा राहणारा आहे. तर गोपाळ हे बेडुग्रामचे रहिवासी आहेत. भाजपाने हे दोघेही पक्षाचे कार्यकर्ते असल्याचा दावा केला आहे. तसेच तृणमूल काँग्रेसवर हत्येचा आरोप केला आहे.
या आरोपांचे तृणमूल काँग्रेसने खंडन केले असून पोलिसांनुसार नजीमुलचा मृत्यू दारुड्यांनी केलेल्या मारहाणीत झाला आहे. तर गोपाळची हत्या व्यवहारातील वैमनस्यातून झाली आहे.
नजीमुल शुक्रवारी रात्री डॉक्टरकडे गेला होता. घरी परतत असताना कथितरित्या दोन दारुड्यांनी त्याच्यावर हल्ला केला. यामध्ये नजीमुलला मारहाण करण्यात आली. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी रात्रीच रस्ता रोखला होता. तसेच तृणमूलच्या कार्यकर्त्यांना अटक करण्याची मागणी केली होती. नजीमुल हा आधी माकपाचा कार्यकर्ता होता. मात्र, लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांने भाजपात प्रवेश केला होता.
दुसऱ्या घटनेमध्ये गोपाळ यांचा मृतदेह एका दुकानात आढळून आला. त्याची हत्या तृणमूलच्या गुंडांनी केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. तसेच त्यांच्या मुलानेही भाजपाच्या नेत्यांच्या जवळचे असल्याने वडीलांची हत्या केल्याचा आरोप केला आहे.