नुपूर शर्मांविरोधात उग्र आंदोलन, हिंसक जमावाचा भाजपाच्या मंत्र्यांवर जीवघेणा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 11:36 AM2022-06-12T11:36:28+5:302022-06-12T11:37:10+5:30
Mob Attack On Nitin Naveen: रांचीमध्ये आंदोलकांनी बिहार सरकारमधील मंत्री आणि भाजपा नेते नितीन नवीन यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. आंदोलकांकडून कारवर झालेल्या हल्ल्यातून नितीन नवीन हे बालंबाल बचावले.
रांची - नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे निर्माण झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाही आहे. दरम्यान, शुक्रवारी त्यावरून देशातील अनेक भागात उग्र आंदोलने झाली. त्यातच रांचीमध्ये आंदोलकांनी बिहार सरकारमधील मंत्री आणि भाजपा नेते नितीन नवीन यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. आंदोलकांकडून कारवर झालेल्या हल्ल्यातून नितीन नवीन हे बालंबाल बचावले.
भाजपा नेते नितीन नवीन हे झारखंडमध्ये एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. मात्र तिथे नुपूर शर्मामविरोधात सुरू असलेल्या आंदोलनातून उफाळलेल्या दंगलीत ते सापडले. त्यातून सहीसलामत सुटका झाल्यानंतर नवीन यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, आम्ही एका हॉटेलमध्ये होतो. तेव्हा शुक्रवारच्या नमाजनंतर आंदोलन सुरू झाल्याची माहिती आम्हाला मिळाली. तीन वाजता परिस्थिती नियंत्रणात आल्याचे समजले. त्यानंतर आम्ही घरी जाण्याच्या हेतूने तिथून निघालो. आमची कार मुख्य रस्त्यावरून निघाली होती. तेव्हा अचानक हजारो लोकांनी आमच्या कारला घेरले. त्यांनी कारवर हल्ला केला. कारच्या काचा तुटल्या. केवळ ईश्वराची कृपा म्हणून आम्ही वाचलो, असे त्यांनी सांगितले.
कारचालकाच्या प्रसंगावधानामुळे बिहारचे मंत्री आणि कारचालकाचे प्राण वाचले. कारचालकाची प्रशंसा करताना नितीन नवीन यांनी सांगितले की, जमावातील अनेक लोकांनी मला चेहऱ्यावरून ओळखलं असावं. तर ज्यांनी ओळखलं नाहीस त्यांनी माझ्या कुर्ता पायजम्यावरून मला हा कुणी तरी राजकारणी असावा हे ओळखलं असावं. अखेर झारखंडच्या पोलीस महासंचालकांना फोन केला तेव्हा मला मदत मिळाली. त्यानंतर बिहारमध्ये येईपर्यंत सुरक्षेसाठी आम्हाला दोन सुरक्षा कर्मचारी दिले.