बाबा रामपाल यांच्या आश्रमासमोर हिंसक संघर्ष
By admin | Published: November 19, 2014 12:15 AM2014-11-19T00:15:13+5:302014-11-19T00:15:13+5:30
या समर्थकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला, अश्रुधुराचे नळकांडे फोडले़ या धुमश्चक्रीत पोलीस, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसह शंभरावर लोक जखमी झालेत़
बरवाला (हिसार) : हरियाणाच्या हिसार जिल्ह्णातील बरवाला नगर येथील स्वयंभू आध्यात्मिक गुरूबाबा रामपाल यांच्या सतलोक आश्रमाबाहेर आज मंगळवारी हिंसक संघर्ष उडाला़ रामपाल यांना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर बाबांच्या समर्थकांनी गोळीबार व दगडफेक केली़ या समर्थकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला, अश्रुधुराचे नळकांडे फोडले़ या धुमश्चक्रीत पोलीस, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसह शंभरावर लोक जखमी झालेत़
नवी दिल्लीतही या घटनेचे पडसाद उमटले़ अनेक रामपाल समर्थकांनी येथील जंतरमंतरवर निदर्शने करीत हरियाणातील बाबा रामपाल यांच्या आश्रमाबाहेरील पोलिसांना हटविण्याची मागणी केली़ रामपाल यांच्यावरील आरोप खोटे असल्याचे सांगत या निदर्शकांनी जोरदार घोषणाबाजी केली़
पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने सोमवारी रामपाल यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करीत शुक्रवारपर्यंत त्यांना न्यायालयासमक्ष हजर करण्याचे आदेश दिले होते़ मंगळवारी पोलीस रामपाल यांना अटक करण्यासाठी आश्रमात पोहोचले़ मात्र रामपाल समर्थकांनी त्यांना रोखले़ यामुळे तणाव वाढला़ पोलीस अधिकाऱ्यांनी आश्रमाची ५० फूट उंच कुंपणाची भिंत तोडण्याचे प्रयत्न करताच आश्रमातील रामपाल समर्थकांनी एका जेसीबी मशिनीला आग लावली़ संध्याकाळ होताच, अधिकाऱ्यांनी आपली मोहीम काही काळ थांबवत आश्रमातील समर्थकांना बाहेर येण्याची सवलत दिली़
जेणेकरून न्यायालयाचा आदेश पाळत रामपाल यांना अटक केली जाऊ शकते़ आश्रमात उपस्थित समर्थकांकडून गोळीबार आणि दगडफेक झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे़ पोलिसांनी आश्रमात शिरण्याचे प्रयत्न करताच बाबा रामपाल यांचे समर्थक त्यांच्यावर तुटून पडले आणि आक्रमक होत पोलिसांवर गोळीबार आणि दगडफेक सुरू केली़ आश्रमात हजारो समर्थक हजर असल्याचे सांगण्यात येत आहे़ एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलीस जीवित हानी रोखण्यासाठी संयम बाळगून आहेत़ (वृत्तसंस्था)