गुजरातमध्ये हिंसक निदर्शने, कॉन्स्टेबलचा मृत्यू
By admin | Published: July 20, 2016 05:33 AM2016-07-20T05:33:16+5:302016-07-20T05:33:16+5:30
गुजरातच्या उना येथील एका घटनेवरून काही दलितांना मारहाण करण्यात आल्यानंतर हिंसाचार उसळला आहे
राजकोट : गुजरातच्या उना येथील एका घटनेवरून काही दलितांना मारहाण करण्यात आल्यानंतर हिंसाचार उसळला आहे. अमरेली भागात आंदोलकांनी मंगळवारी पोलिसांवर केलेल्या दगडफेकीत आणि हल्ल्यात एका कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला, तर अनेक ठिकाणी आंदोलकांनी बस गाड्यांची तोडफोड केली. दरम्यान, मंगळवारी तीन तरुणांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दगडफेकीत जखमी झालेले स्थानिक गुन्हे शाखेचे हेड कॉन्स्टेबल पंकज अमरेलीयांचा राजकोटमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. आंदोलक आणि पोलिसांसह दहा जण जखमी झाले आहेत. दरम्यान, दलितांना मारहाण केल्याच्या घटनेनंतर जुनागढ जिल्ह्यात बटवा भागात तीन जणांनी विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. राजकोटच्या गोंडाल आणि जामकांडोरना येथे सोमवारी सात दलित तरुणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. जुनागढ, जामनगर आणि अमरेली जिल्ह्यात राज्य परिवहन निगमच्या काही बसची जमावाने तोडफोड केली, तर अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलकांनी राजकोट जिल्ह्यात धोराजी येथे एक बस जाळली. दलितांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आंबेडकरनगर सोसायटीत दिनेश कुमार (२१), दिनेश वेगरा (२३) आणि रसिक विंजुरा (४०) यांनी आत्महत्येचा
प्रयत्न केला.