हिंसक आंदोलनांमुळे लोकशाही बनते दुबळी - राष्ट्रपती कोविंद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 01:28 AM2020-02-01T01:28:03+5:302020-02-01T05:46:04+5:30
राष्ट्रपती कोविंद यांनी संसदेने मंजूर केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत खासदारांना धन्यवाद दिले.
नवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्वप्न प्रत्यक्षात आणणे होय, अशा शब्दांमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विधेयकाचे जोरदार समर्थन केले. त्याच वेळी कोणतीही आंदोलने हिंसक पद्धतीने झाल्यास लोकशाही दुबळी बनत असल्याचेही राष्ट्रपती कोविंद यांनी सांगितले.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पहिल्या दिवशी, शुक्रवारी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित दोन्ही सदनांच्या संयुक्त बैठकीत राष्टÑपती कोविंद यांचे अभिभाषण झाले. या दशकाच्या अखेरपर्यंत भारताला ५ ट्रिलिअन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी सर्व संबंधितांशी चर्चा करून निर्णय होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
राष्ट्रपती कोविंद यांनी संसदेने मंजूर केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत खासदारांना धन्यवाद दिले. भारताच्या विभाजनाच्या वेळी राष्टÑपिता महात्मा गांधी यांनी तेथील हिंदू व शीख नागरिकांना भारतामध्ये कधीही येता येईल, असा शब्द दिला होता. संसदेने मंजूर केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा ही बापूजींच्या स्वप्नाची पूर्ती असल्याचे राष्ट्रपती म्हणाले. देश सध्या राष्टÑपित्याच्या जयंतीचे १५०वे वर्ष साजरे करीत असतानाच हा कायदा झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला होत असलेल्या विरोधाकडे लक्ष वेधतानाच, राष्ट्रपती कोविंद यांनी कोणतेही आंदोलन हे हिंसेच्या मार्गाने झाल्यास, त्यामुळे लोकशाही व्यवस्था दुबळी बनते, असे प्रतिपादन केले. आंदोलकांनी हिंसेचा मार्ग सोडण्याचे आवाहनही त्यांनी केले.
राष्ट्रपतींनी नागरिकत्व सुधारणा कायद्याचा उल्लेख करताच, सत्ताधारी बाकावरील भाजपच्या सदस्यांनी जोरदारपणे बाके वाजवून त्यांचे स्वागत केले, तर कॉँग्रेस सदस्यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात घोषणा दिल्या. या विधेयकाचा निषेध करण्यासाठी कॉँग्रेससह १४ विरोधी पक्षांचे सदस्य संसदेत काळ्या पट्ट्या बांधून आले होते.
भारतीय सैन्याला स्वयंपूर्ण करण्याकडे सरकारचे संपूर्ण लक्ष असल्याचे स्पष्ट करून राष्ट्रपती म्हणाले की, सैन्याला अत्याधुनिक शस्त्रास्त्रे पुरविण्याला सरकार कटिबद्ध आहे. ही हत्यारे पुरेशा प्रमाणात असतील. सैन्यदल प्रमुखांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे तसेच सेनाविषयक विशेष विभाग सुरू करून तिन्ही सेनादलांमध्ये योग्य समन्वय राखण्याचा प्रयत्न सरकार करीत असल्याचे दिसून येत आहे.
देशाच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाचीही राष्ट्रपतींनी स्तुती केली. ‘गगनयान’ आणि ‘आदित्य १’ ही मिशन योग्य मार्गावर असल्याचेही ते म्हणाले. राष्ट्रपतींच्या भाषणाचा इंग्रजी अनुवाद उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी वाचून दाखविला. याप्रसंगी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, लोकसभाध्यक्ष ओम बिरला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मंत्रिमंडळातील सहकारी, खासदार उपस्थित होते.
देशवासीयांचे कौतुक
अयोध्येतील मशिद-मंदिर वादात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर देशातील जनतेने जे सामंजस्य दाखविले, त्याबद्दल राष्ट्रपती कोविंद यांनी देशवासीयांचे कौतुक केले.
दहशतवाद झाला कमी
काश्मीरमधील नागरिकांच्या सहकार्यामुळे तेथील दहशतवाद आता बराच कमी झाल्याचे राष्टÑपतींनी सांगितले. तेथे दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्याचे अधिकार सुरक्षा दलांना देण्यात आले आहेत. त्यामुळेही दहशतवादावर नियंत्रण मिळविणे शक्य झाल्याचे कोविंद म्हणाले. यादरम्यानच पाकिस्तानमध्ये अल्पसंख्य समाजावर होत असलेल्या अत्याचाराची राष्टÑपतींनी कडक शब्दामध्ये निंदा केली. नुकत्याच नानकानासाहिब येथे झालेल्या घटनेकडे त्यांनी लक्ष वेधले.
उज्ज्वल भविष्यासाठी स्वदेशी
राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात उज्ज्वल भवितव्यासाठी देशातील जनतेने आजपासूनच स्वदेशी वस्तू खरेदी कराव्यात, असेही आवाहन केले. मोबाइलचे उत्पादन करणारा भारत हा जगातील दुसºया क्रमांकाचा देश आहे, असे नमूद करून ते म्हणाले की, देशातील उद्योजकांसाठी मुद्रा योजनेखाली १0 लाख कोटी मंजूर करण्यात आले आहेत. पुढील पाच वर्षांत अत्याधुनिक पायाभूत सुविधांसाठी १00 लाख कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी २५ लाख कोटी रुपये खर्च केले जातील, असे सांगून, पंतप्रधान किसान योजनेखाली आतापर्यंत ४३ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत, याचाही आवर्जून उल्लेख केला.