नुपूर शर्माविरोधात पश्चिम बंगालमध्ये हिंसक निदर्शने, आतापर्यंत 200 पेक्षा जास्त आंदोलक ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 08:10 PM2022-06-13T20:10:17+5:302022-06-13T20:11:42+5:30
हावडा, मुर्शिदाबाद आणि नादिया जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काही भागात कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
कोलकाता: भारतीय जनता पक्षाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा हिने प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उसळला. याप्रकरणी आतापर्यंत 200 हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर 42 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बंगालचे पोलिस महासंचालक मनोज मालवीय यांनी सोमवारी ही माहिती दिली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे त्यांनी सांगितले.
पश्चिम बंगालमधील हिंसाचारग्रस्त जिल्ह्यांमध्ये सोमवारी काही भागात निदर्शने झाली. अनेक भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पूर्व रेल्वेच्या सियालदह-हशनाबाद विभागात सकाळी आंदोलकांनी रेल्वे रुळ अडवल्याने रेल्वे सेवा प्रभावित झाली. आंदोलकांनी ट्रॅक अडवण्यासाठी टायर पेटवले होते. नुपूर शर्मा यांच्या पुतळ्याचेही दहन करण्यात आले.
अनेक ठिकाणी कलम 144 लागू
हावडा, मुर्शिदाबाद आणि नादिया जिल्ह्यातही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काही भागात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. स्थानिक व्यापाऱ्यांनी 72 तासांच्या बंदची हाक दिली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, बेथुनदहरी रेल्वे स्थानकावर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. रविवारी येथे एका ट्रेनची तोडफोडही करण्यात आली.
नुपूर शर्मा यांना बोलावले
दरम्यान, कोलकाता पोलिसांनी नुपूर शर्मा यांना पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. तिला 20 जून रोजी नरकेलडांगा पोलिस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले आहे, असे एका अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले. शर्मा यांनी टेलिव्हिजनवरील एका कार्यक्रमादरम्यान केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यामुळे देशात अनेक भागांत हिंसक निदर्शने सुरू आहेत.