VIP तुरुंगवास; लालूंना मच्छरदाणी, टीव्ही, वर्तमानपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 02:27 AM2017-12-25T02:27:09+5:302017-12-25T02:27:17+5:30
चारा घोटाळ््याशी संबंधित फौजदारी खटल्यात दोषी ठरवून तुरुंगात धाडण्यात आलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख लालू प्रसाद यादव
रांची : चारा घोटाळ््याशी संबंधित फौजदारी खटल्यात दोषी ठरवून तुरुंगात धाडण्यात आलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख लालू प्रसाद यादव यांना येथील बिरसा मुंडा मध्यवर्ती कारागृहाच्या वरच्या दर्जाच्या (अपर डिव्हिजन) कोठडीत ठेवण्यात आले असून तेथे त्यांना इतर कैद्यांहून विशेष सुविधा देण्यात आल्या आहेत.
तुरुंग प्रशासनातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लालू प्रसाद वरच्या दर्जाच्या कोठडीतील कैदी असल्याने नियमानुसार त्यांना एक मच्छरदाणी, रोजचे एक वर्तमानपत्र, एक टीव्ही आणि तुरुंगातील पलंग या सुविधा देण्यात आल्या आहेत. पहिल्या रात्री लालूंना चपाती, दाल व कॅबेज असे तुरुंगातील जेवणे घेतले. तीन वर्षांपूर्वी हृदयावर शस्त्रक्रिया झाल्यापासून लालूंना आहाराचे पथ्यपाणी आहे. त्यामुळे त्यांना भाताऐवजी चपाती द्यावी, अशी विनंती त्यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांनी केली होती. हवी असल्यास त्यांना घरच्या जेवणाची सवलतही मिळेल. बिरसा मुंडा कारागृहातील या ‘अपर डिव्हिजन’ कोठडीतील लालूंचे हे दुसरे वास्तव्य आहे.
सीबीआय विशेष न्यायालय त्यांना ३ जानेवारी रोजी शिक्षा सुनावणार आहे. या कोठडीत शिक्षा झालेले सात आजी-माजी आमदार लालूंसोबत आहेत.
आता जामीन कठीण
एकाच प्रकारच्या गुन्ह्यासाठी ही दुसरी शिक्षा असल्याने लालू आता ‘सराईत गुन्हेगार’ या वर्गात गणले जातील. अशा गुन्हेगारांना जामीन देण्यास वरिष्ठ न्यायालये फारशी राजी नसतात. त्यामुळे ३ जानेवारी रोजी शिक्षा जाहीर झाल्यावर लालूंना जामीन मिळणे कठीण जाऊ शकेल, असे मत पाटणा उच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील वाय. व्ही. गिरी यांनी व्यक्त केले.
याआधी सन २०१३ मध्ये चारा घोटाळ््याच्या पहिल्या खटल्यात लालूंना पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने जामीन देईपर्यंतचे ७७ दिवस त्यांनी याच कोठडीत काढले होते.
तुरुंगातील इतर कैद्यांना लालूंना भेटू दिले जाणार नाही. गेल्या वेळी लालू यांना यांच तुरुंगात नियम मोडून जादा सुविधा दिल्या गेल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. शनिवारी न्यायालयातून तुरुंगात आल्यावर लालूंनी लगेच कोठडीत जाऊन आराम केला, असे कारागृह अधीक्षक अशोक चौधरी यांनी सांगितले.
लालूंना पोलिसांच्या गाडीतून तुरुंगात आणले गेले. बिहार ‘राजद’ प्रमुख व माजीमंत्री अन्नपूर्णा देवी यांच्यासह इतर नेत्यांनी वेगळ््या वाहनांमधून येऊन कारागृहाच्या होटवार येथील मुख्य प्रवेशव्दारापर्यंत सोबत केली. लालूजींची तुरुंगातील जेवण जेवायलाही तक्रार नसते. पण त्यांना लागले तर घरचे जेवण देण्याची आम्ही व्यवस्था करू, असे अन्नपूर्णा देवी म्हणाल्या.
झारखंडमध्ये पाच व बिहारमध्ये एक असे लालूंवर चारा घोटाळ््याचे एकूण सहा खटले होते. त्यापैकी झारखंडमधील दोन खटल्यांमध्ये ते दोषी ठरले आहेत. इतर प्रलंबित खटलेही लवकर निकाली काढण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.