व्हीआयपींना बाजरीची भाकरी, २० देशांचे कूक बनवणार त्यांच्या देशाची आवडती डीश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 07:59 AM2023-08-30T07:59:38+5:302023-08-30T08:19:57+5:30
सर्व देशांना त्यांच्या पसंतीचा नाष्टा, दुपारचे भोजन, रात्रीचे भोजन यात लागणाऱ्या खाद्यपदार्थांची यादी मागवण्यात आली आहे
- संजय शर्मा
नवी दिल्ली : जी-२० संमेलनात विदेशी पाहुण्यांसाठी पहिल्या दिवशी दुपारच्या जेवणात भरडधान्याचे स्वादिष्ट भोजन तयार करण्यात येणार आहे. बाडमेरची प्रसिद्ध हलवाई टीम हे भोजन तयार करणार आहे.
सर्व देशांना त्यांच्या पसंतीचा नाष्टा, दुपारचे भोजन, रात्रीचे भोजन यात लागणाऱ्या खाद्यपदार्थांची यादी मागवण्यात आली आहे व या देशांमध्ये काम केलेले कूक हे पदार्थ तयार करीत आहेत. जी-२० संमेलनात सहभागी होणाऱ्या देशांना ९ सप्टेंबर रोजी दुपारच्या भोजनात पाहुण्या देशांसाठी भरडधान्याचे स्वादिष्ट भोजन तयार केले जात आहे. बाडमेर येथील सुप्रसिद्ध कूकची टीम प्रगती मैदानात व पूसा इन्स्टिट्यूटमध्ये हे भोजन तयार करीत आहे. ज्वारी, बाजरी, नाचणीपासून तयार होणारे पक्वान्न पाहुण्यांना खाऊ घालणार आहेत.
हॉटेल मौर्या शेरेटनमध्ये अमेरिकी, इटालियन, कॉन्टिनेंटल फूड, ताज पॅलेसमध्ये चायनीज, हयातमध्ये जपानी, ललितमध्ये ऑस्ट्रेलियन, शांग्रिलामध्ये ब्रिटिश भारतीय खाद्यपदार्थ, अशा प्रकारे वेगवेगळ्या देशांच्या आवडीचे खाद्यपदार्थ प्रत्येक हॉटेलमध्ये ठेवले जाणार आहेत. हे तयार करणारे कूकही त्या देशांचे तज्ज्ञ कूक असतील.
‘त्यांच्या’ पत्नींसाठी असा आहे कार्यक्रम...
९ सप्टेंबर रोजी सर्व राष्ट्राध्यक्षांच्या पत्नींसाठी दिल्लीच्या पूसा इन्स्टिट्यूटमध्ये अनोखा कार्यक्रम आयोजित केला आहे.
त्यांना भरडधान्याच्या शेतामध्ये सफर घडवून आणली जाईल.
त्या भरडधान्य उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना भेटतील व भरडधान्य उत्पादन करण्यातील बारकावेही समजून घेतील.
त्यांचे भरडधान्याचे दुपारचे जेवणही पूसा इन्स्टिट्यूटमध्ये आहे. बाडमेर येथील सुप्रसिद्ध कूक टीम हे भोजन करणार आहे.
राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी ९ सप्टेंबरला भरडधान्याचे दुपारचे भोजनानंतर मॉडर्न गॅलरी ऑफ आर्ट आणि नॅशनल म्युझियम पाहण्यास जाणार आहेत.
कोणते राष्ट्रप्रमुख कोणत्या हॉटेलमध्ये?
अमेरिका राष्ट्राध्यक्ष जो बायडेन : मौर्य शेरेटॉन (दिल्ली)
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग : ताज पॅलेस हॉटेल
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सूनक : शांग्रिला हॉटेल
फ्रान्सचे पंतप्रधान इमॅन्यूएल मॅक्रॉन : क्लॅरिजेस हॉटेल
सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान : लीला पॅलेस हॉटेल
यूएइचे अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान : ताजमहाल हॉटेल