Vir Das: “माझं काम सुरूच ठेवणार, काही झालं तरी थांबणार नाही”; वीर दासने स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 10:49 AM2021-11-22T10:49:52+5:302021-11-22T10:53:15+5:30
वीर दासच्या या संपूर्ण व्हिडीओची एक छोटी क्लिप ट्विटरवर शेअर करून लोकांनी त्याला चांगलेच सुनावले आहे.
नवी दिल्ली: अमेरिकेत जाऊन भारताविरोधी केलेल्या विधानांमुळे चर्चेत आलेला आणि देशभरातून टीका होत असलेल्या कॉमेडियन वीर दास (Vir Das) याने या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करत रोखठोक मते मांडली आहेत. माझे काम सुरूच ठेवणार असून, काही झाले तरी आता थांबणार नाही, असे वीर दासने म्हटले आहे.
अमेरिकेतील जॉन कॅनेडी सेंटर येथे आयोजित एका कार्यक्रमात वीर दासने भारताविरोधात वक्तव्ये केली होती. या वक्तव्यानंतर अनेकांनी सोशल मीडियाद्वारे त्याच्यावर नाराजी व्यक्त करत संतप्त प्रतिक्रिया दिली होती. वीर दासने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्याच्याविरोधात अनेक तक्रारही दाखल करण्यात आल्या आहेत. यातच आता वीर दासने या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.
माझे काम सुरूच ठेवणार, काही झाले तरी थांबणार नाही
मी इथे काम करण्यासाठी आलो आहे आणि यापुढेही ते सुरुच ठेवेन. मी थांबणार नाही. लोकांना हसवण्यासाठी त्यांच्यात प्रेम वाढवण्यासाठी भारतात अधिक कॉमेडी क्लबची आवश्यकता आहे. माझे काम लोकांना हसवणे आहे. जर तुम्हाला ते विचित्र वाटत असेल तर तुम्ही हसू नका. मी आतापर्यंत कधीही सेन्सरशिपचा सामना केलेला नाही, असे वीर दासने म्हटले आहे.
काय म्हणाला होता वीर दास?
मी अशा भारतातून आलो आहे जिथे हवा गुणवत्ता निर्देशांक ९००० आहे तरीही आम्ही आमच्या छतावर झोपतो आणि रात्री तारे मोजतो. मी अशा भारतातून आलो आहे जिथे आम्हाला शाकाहारी असण्याचा अभिमान वाटतो आणि तरीही आमचा भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकर्यांवर धावून जातो. मी अशा भारतातून आलो आहे, जिथे दिवसा महिलांची पूजा केली जाते आणि रात्री त्यांच्यावर बलात्कार होतो, असे खळबळजनक विधान वीर दासने केले होते. अलीकडेच वीर दासने त्याच्या यूट्यूब चॅनलवर ‘आय कम फ्रॉम टू इंडियाज’ हा व्हिडिओ अपलोड केला. सहा मिनिटांच्या व्हिडिओमध्ये, दासने देशाच्या कथित दुहेरी चारित्र्याबद्दल भाष्य केले आहे. वीर दासच्या या संपूर्ण व्हिडीओची एक छोटी क्लिप ट्विटरवर शेअर करून लोकांनी त्याला चांगलेच सुनावले आहे.