VIRAL: अटलबिहारींचं जाणं अन् मोदींचं हसणं; 'त्या' व्हायरल फोटोमागचं सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2018 12:38 PM2018-08-19T12:38:35+5:302018-08-19T12:49:59+5:30
माजी पंतप्रधान व भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे दिल्लीतील एम्स रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने गुरुवारी संध्याकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी निधन झाले.
नवी दिल्ली- माजी पंतप्रधान व भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे दिल्लीतील एम्स रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने गुरुवारी संध्याकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी निधन झाले. अटलबिहारी वाजपेयी हे स्पष्टवक्ते होते, कवी होते, अनेकदा मृदू असत, आपल्या भूमिकांबाबत ठाम असत आणि विरोधकांसह अनेक क्षेत्रातील मान्यवरांबरोबर त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते.
अटलजींच्या जाण्यानं पूर्ण देश शोकसागरात बुडाला होता. अटलबिहारी वाजपेयी एम्समध्ये व्हेंटिलेटरवर असताना नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्र्यांनी एम्समध्ये जाऊन वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूसही केली होती. 16 ऑगस्टला वाजपेयींच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक फोटो व्हायरल झाला आहे. त्या फोटोमध्ये मोदी एम्स रुग्णालयातील डॉक्टरांबरोबर बोलताना त्यांच्या चेह-यावर हास्य फुललेलं पाहायला मिळतंय. त्याच पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीनं या फोटोच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला आहे. त्या वृत्तवाहिनीच्या पाहणीत हा फोटो मोदींचाच असल्याचं समोर आलं.
मोदींचे कपडे आणि बॉडीगार्ड यांचे चेहरे मिळते-जुळते असल्याचंही या फोटोतून स्पष्ट होतेय. परंतु याचा अर्थ वाजपेयींच्या मृत्यूनंतर मोदी हसत असल्याचा दावा करणं चुकीचे ठरेल. कारण मोदी 16 ऑगस्टच्या दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी वाजपेयींना भेटून बाहेर आले. तर वाजपेयींचं निधन 16 ऑगस्टच्या संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी झाले. त्यामुळे वाजपेयींच्या निधनानंतर मोदी एम्समधील डॉक्टरांबरोबर हसत असल्याचा दावा करणं चुकीचं आहे, कारण मोदी अटलजींच्या निधनानंतर एम्स रुग्णालयात उपस्थितच नव्हते, असं एका वृत्तवाहिनीच्या पाहणीत आढळलं आहे.
तर दुस-या एका फोटोमध्ये एका पार्थिव शरीराला डॉक्टर मान झुकवून श्रद्धांजली देत असल्याचं पाहायला मिळतंय. तो फोटो अटलजींचा असल्याचीही चर्चा आहे. परंतु तो फोटो अटलजींचा नसून 2012 रोजी चीनमध्ये मृत्यू झालेल्या वू हुआजिंग हिचा आहे. तिने मृत्यूनंतर स्वतःचे अवयव रुग्णालयाला दान केले होते. म्हणून डॉक्टर तिला श्रद्धांजली देत होते. तर जमिनीवर अटलजींच्या ठेवलेल्या पार्थिवाचा फोटोही समोर आला होता. परंतु अटलबिहारी वाजपेयींचा मृतदेह जमिनीवर ठेवण्यातच आला नव्हता. त्यांचं पार्थिव तिरंग्यात सन्मानानं लपेटून ठेवण्यात आलं होतं. तसेच मोदींनी अर्ध्या हाताचा कुर्ताही परिधान केला नव्हता, अटलजींना श्रद्धांजली वाहताना मोदींनी पूर्ण हाताचा कुर्ता घातला होता. त्यामुळे सोशल मीडियावर मोदींसंदर्भात व्हायरल होणारे फोटो किती खरे आणि किती खोटे आहेत, हाच एक संशोधनाचा विषय आहे.