Viral News: रशिया आणि जर्मनीचा मृत्यू तर जापान, आफ्रिका आणि अमेरिका जिवंत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 07:30 PM2022-03-13T19:30:49+5:302022-03-13T19:31:46+5:30
Viral News: ही बातमी वाचून व्लादिमीर पुतिन आणि जो बायडन यांनाही धक्का बसेल. वाचा 5 भावांची अफलातून गोष्ट...
पाटणा: रशिया आणि अमेरिकेचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि जो बायडेन यांनी ही बातमी वाचली तर त्यांना धक्काच बसेल. सध्याच्या रशिया-युक्रेन युद्धाच्या काळात जर कोणी रशियाचा मृत्यू झाला असे म्हणत असेल आणि जापान, जर्मनी, अमेरिका आणि रशिया यांच्यात कधीही युद्ध झाले नाही असे कोणी म्हटले तर, तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. पण, तुम्ही जसा विचार करताय, तसं काहाही घडलेले नाही.
बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील एक गाव आहे, जिथे दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने जगातील 5 शक्तिशाली देशांबद्दल चर्चा होत असते. गावातील एक कुटुंबात या देशांच्या नावावर 5 भावांची नावे ठेवण्यात आली आहेत. या 5 भावांची नावे- रशिया, जर्मनी, अमेरिका, आफ्रिका आणि जपान अशी आहेत. हे भाऊ केवळ गावातच नाही तर जवळपासच्या अनेक पंचायतींमध्ये त्यांच्या अनोख्या नावांमुळे ओळखले जातात. अमेरिका, आफ्रिका, जर्मनी, रशिया आणि जपान या पाच भावांमध्ये रशिया आणि जर्मनीचा मृत्यू झाला आहे.
अशी पडली देशांचे नावे...
पाच भावांच्या अशा नामकरणामागे एक कथा आहे. जापान शर्मा यांनी सांगितले की, त्यांचे काका दुसऱ्या महायुद्धावेळी भारतीय सैन्यात होते. त्यावेळी लष्करात अमेरिकेबद्दल बरीच चर्चा झाली होती. युद्धानंतर काका घरी परतले तेव्हा त्यांनी आपल्या दोन पुतण्यांची नावे अमेरिका आणि आफ्रिका अशी ठेवली. इतर भावांच्या जन्मानंतर त्यांचीही नावे देशांच्या नावावर ठेवण्यात आली. शाळेतही त्यांचे नावे या देशांच्या नावावर लिहीण्यात आली आहेत.
ओळख मिळाली, पण अनेक अडचणी आल्या...
जापान शर्मा यांनी सांगितले की, सर्वात मोठा भाऊ अमेरिका (71), नंतर आफ्रिका (65), तिसऱ्या क्रमांकावर जर्मनी (55), चौथ्या क्रमांकावर रशिया (54) आणि शेवटच्या क्रमांकावर ते स्वतः (52 वर्षे) आहेत. रशिया यांचा 10 वर्षांपूर्वी आणि जर्मनींचा 5 वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. अशा आगळीवेगळ्या नावामुळे ओळख मिळाली, पण बऱ्याच अडचणीदेखील आल्या. अनेकदा लोक आमच्यावर हसतात, नवलंही करतात. गावात येणारे लोक आम्हाला नक्की भेटायला येतात.
पोलिसांनी एफआयआरही नोंदवला नाही
गावातील लोक त्यांच्या नावाशी संबंधित एक कथा सांगतात. या भावांमध्ये कधीही भांडण झाले नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. पण, सुमारे 35 वर्षांपूर्वी गावातील एका व्यक्तीसोबत या पाच भावांचे भांडण झाले होते. या प्रकरणी जेव्हा तो ग्रामीण पोलिस ठाण्यात पोहोचला तेव्हा त्याच्या तक्रारीतील आरोपींची नावे ऐकून पोलिसांनी त्याला वेड्यात काढले. अर्जदार देशांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचा प्रयत्न करत असल्याचे लक्षात येताच त्यांनी त्या व्यक्तीला पोलीस ठाण्यातून हकलून लावले.