व्हायरल सच! जाणून घ्या सोशल मीडियावर शेअर होणाऱ्या आजी-नातीच्या भेटीची 'सत्यकथा'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 09:41 PM2018-08-22T21:41:55+5:302018-08-22T21:45:12+5:30
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या छायाचित्रावरुन आपण कुठला समाज निर्माण करत आहोत, असा संदेश फिरत आहे. कारण, फोटोतील मुलीला तिच्या आई-वडिलांनी तिच्या आजीबद्दल खोटे सांगितले होते. तुझी आजी त्यांच्या नातेवाईकांकडे
मुंबई - सोशल मीडियावर सध्या एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोला शेअर करणाऱ्यांकडून आजी अन् नातीची भेट असल्याचे भावनात्मकपणे सांगण्यात येत आहे. एका शाळेने आपल्या विद्यार्थ्यांची सहल वृद्धाश्रमात नेली होती. या वृद्धाश्रमात सहलीतील एका विद्यार्थीनीली तिची आजी भेटल्याचे सांगत हा फोटो शेअर होत आहे. विशेष म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, हरभजनसिंग यांनीही हा फोटो शेअर केला आहे. मात्र, या फोटोमागील सत्य वेगळेच आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या छायाचित्रावरुन आपण कुठला समाज निर्माण करत आहोत, असा संदेश फिरत आहे. कारण, फोटोतील मुलीला तिच्या आई-वडिलांनी तिच्या आजीबद्दल खोटे सांगितले होते. तुझी आजी त्यांच्या नातेवाईकांकडे राहात असल्याचे मुलीला सांगण्यात आले होते. पण, मुलीला तिची आजी वृद्धाश्रमात भेटल्याचे फोटोसोबतच्या माहितीवरुन सांगण्यात येत आहे. मात्र, सोशल मीडियावर फिरणाऱ्या या फोटोचे सत्य वेगळेच आहे.
Shame on such people... https://t.co/I589oDJMqw
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) August 21, 2018
सोशल मीडियावर शेअर होणारा हा फोटो सन 2007 सालचा असून अहमदाबादच्या घोडासर येथील वृद्धाश्रमातील आहे. या फोटोतील आजीचे नाव दमयंती असून नातीचे नाव भक्ती असे आहे. मात्र, माझी आजी स्व:खुशीने वृद्धाश्रमात राहात असल्याचे भक्तीने म्हटले आहे. तसेच आजीला कुणीही घरातून हाकलून दिले नाही. पण, त्यावेळी आजी कुठे आहे हे मला माहित नव्हते. अचानक तिची आणि माझी वृद्धाश्रमात भेट झाली. त्यामुळे आम्हा दोघांनाही रडू आवरता आले नसल्याची 11 वर्षांपूर्वीची आठवण सांगताना भक्ती भावूक झाली होती. त्यावेळी आजीला भेटून मी भावूक झाले होते, त्यामुळेच माझ्या डोळ्यातून अश्रू कोसळले. कारण, मी आजीवर खूप प्रेम करायची, आजही मी आजीवर तेवढेच प्रेम करते, असेही भक्तीने म्हटले. मात्र, आता आजीला घरी नेण्यात काहीच अर्थ नाही. कारण, या वृद्धाश्रमात आजीचा जीव रमला आहे, तिला इथेच राहायला आवडते, येथेच आजीचं एक नवीन कुटुंब बनल्याचे भक्तीने म्हटले.
माझी आजी वृद्धाश्रमात राहात असली तरी, मी तिच्याशी दररोज फोनवरुन बोलत असते. माझ्या आई-वडिलांच्या घरीही आजी अधून-मधून येत असते. त्यामुळे माझ्या वडिलांबाबत चुकीचा मेसेज देणे उचित नाही. जर, माझ्या वडिलांनी आजीला हाकलून दिले असते, तर मीच वडिलांसोबत नाते ठेवले नसते, अशा शब्दात भक्तीने या व्हायरल फोटोचे सत्य उलगडले आहे. तर आजी दमयंतीनेही मी स्वत:च्या मर्जीने येथे राहात असल्याचे सांगतिले आहे.