अभिनंदन अमेरिकेत पकडला गेला, क्षेपणास्त्र डागायला गेला होता; भाजप खासदाराचं अगाध ज्ञान ऐकाच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 06:59 PM2021-09-20T18:59:50+5:302021-09-20T19:13:36+5:30
भाजप खासदार छतर सिंह दरबार यांच्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल
भोपाळ: पंतप्रधान नरेंद्र मोदींचं गुणगान गाताना भारतीय जनता पक्षाच्या खासदारानं इतिहास-भूगोल बदलून टाकला आहे. या खासदार महोदयांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांचं अगाध ज्ञान ऐकून अनेकांना हसू आवरता येत नाहीए. छतर सिंह दरबार असं या खासदारांचं नाव असून ते लोकसभेत मध्य प्रदेशातल्या धार मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात.
उज्ज्वला योजना २.० च्या अंतर्गत आयोजित कार्यक्रमात दरबार यांना अध्यक्ष म्हणून बोलावण्यात आलं होतं. उज्ज्वला योजनेचे फायदे सांगताना दरबार अमेरिकेपर्यंत पोहोचले. यावेळी यूपीए सरकारला लक्ष्य करण्याच्या हेतूनं त्यांनी अजब दावे केले. 'अमेरिकन सैनिक आणि दहशतवादी भारतीय जवानांची मुंडकी कापून घेऊन गेले. ते या मुंडक्यांनी फुटबॉल खेळले. भारताला खिजवण्यासाठी त्यांनी याचा व्हिडीओ तयार केला,' असं दरबार म्हणाले. धार यांच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अभिनंदन अमेरिकेत पकडला गेला. त्यानं विमानातून तोफगोळे, क्षेपणास्त्र सोडली. पंतप्रधान मोदींनी त्याची सुटका केली- भाजप खासदार छतर सिंह दरबार https://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/JwQLiEJIt7
— Lokmat (@MiLOKMAT) September 20, 2021
आता भारत याचना करत नाही
पंतप्रधान मोदींचं कौतुक करताना दरबार यांनी यूपीए सरकारवर टीका केली. 'अमेरिकेचे सैनिक आणि दहशतवादी भारतीय जवानांचं शिर घेऊन गेले. तेव्हा यूपीए सरकार मोठ्या देशांकडे याचना करत होतं. आम्हाला आमच्या सैनिकांची शिर परत द्या यासाठी यूपीए सरकार मदत मागत होतं. मात्र मोदींच्या नेतृत्त्वाखालील भारत याचना करत नाही,' असं दरबार म्हणाले.
...म्हणे अभिनंदन अमेरिकेत पकडला गेला
दरबार यांनी त्यांच्या भाषणात हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचाही उल्लेख केला. 'तुमच्या लक्षात असेल तो आपला सैनिक कोण होता..? तो वायुसेना अधिकारी पकडला गेला होता अमेरिकेत. अभिनंदन! अभिनंदन तिथे पुष्पवृष्टी करायला गेला नव्हता. अभिनंदन तिथे क्षेपणास्त्र डागायला गेला होता. तोफगोळे फोडायला गेला होता. तिथे काही कारणांमुळे तो पकडला गेला. त्यावेळी मी सभागृहात उपस्थित होतो. मी मोदींचं कौशल्य त्यावेळी पाहिलं. माझ्या अभिनंदनला सोडवा असं म्हणत त्यावेळी मोदींनी कोणासमोर हात पसरले नाहीत,' असं दरबार म्हणाले. छतरसिंह दरबार यांचं अगाध ज्ञान उपस्थितांना हसू अनावर झालं.