‘विराट’ही भंगारात?

By admin | Published: February 22, 2017 01:12 AM2017-02-22T01:12:19+5:302017-02-22T01:13:17+5:30

भारतीय नौदलात ३० वर्षांची गौरवपूर्ण सेवा बजावलेली ‘आयएनएस विराट’ ही विमानवाहू युद्धनौका येत्या ६ मार्च

'Virat' is also scraped? | ‘विराट’ही भंगारात?

‘विराट’ही भंगारात?

Next

नवी दिल्ली : भारतीय नौदलात ३० वर्षांची गौरवपूर्ण सेवा बजावलेली ‘आयएनएस विराट’ ही विमानवाहू युद्धनौका येत्या ६ मार्च रोजी सक्रिय सेवेतून अधिकृतपणे निवृत्त झाल्यानंतर तिला बहुधा नाईलाजाने भंगार म्हणून विकावे लागेल, असे संकेत नौदलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिले.
निवृत्तीनंतर ‘विराट’चे शैक्षणिक संग्रहालय म्हणून जतन करण्याचा प्रस्ताव आंध्र प्रदेश सरकारने दिला असला तरी त्यातून प्रत्यक्ष काही निष्पन्न होईल असे दिसत नाही. एवढी अजस्त्र युद्धनौका वापर न करता
सांभाळणे खर्चिक असल्याने व नांगर टाकून ती नुसती बिनकामाची उभी करून ठेवण्यास गर्दीच्या मुंबई बंदरात किंवा कारवार नौदल तळावरही जागा नसल्याने बहुधा ‘विराट’च्या नशिबी भंगारात जाणेच येऊ शकेल, असे हा अधिकारी म्हणाला.
खरोखर असे घडले तर ती ‘आयएनएस विक्रांत’ या
भारतीय नौदलाच्या पहिल्या विमानवाहू युद्धनौकेच्या नशिबी आलेल्या शोकांतिकेची पुनरावृत्ती ठरेल. या युद्धनौकेचेही संग्रहालयात रूपांतर करण्याचे महाराष्ट्र सरकार व काही खासगी संस्थांनी दिलेले प्रस्तावा फलद्रुप होतील याची तब्बल १७ वर्षे वाट पाहिल्यानंतर सन २००४ मध्ये ‘विक्रांत’चा भंगारात लिलाव पुकारावा लागला होता.
२७,८०० टन वजनाची आणि १३ मजली उंचीच्या ‘विराट’चे संग्रहालय करण्यासाठी किमान एक हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. शिवाय ती नांगर टाकून समुद्रकिनारी कायमस्वरूपी उभी करून ठेवण्यासाठी सोईची जागा शोधणे गरजेचे आहे. शिवाय संग्रहलायच्या महसुलातूनच तिच्या देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च सुटेल, अशी व्यवस्था करावी लागेल.
हा नौदल अधिकारी म्हणाला की, आंध्र प्रदेश सरकारच्या प्रस्तावातून हे शक्य होईल, असे दिसत नाही. कारण आंध्र प्रदेश सरकार युद्धनौकेसाठी पैसे द्यायला तयार आहे. पण तिचे संग्रहालय म्हणून जतन करण्याचा निम्मा सरकार नौदलाने उचलावा, असे त्या सरकारला वाटते. परंतु देखभाल आणि
दुरुस्तीसाठी तांत्रिक सहकार्य व सल्ला फार तर आम्ही देऊ. पण या निवृत्त युद्धनौकेवर सतत पैसा खर्च करत राहणे शक्य होणार नाही, असे नौदलाचे म्हणणे आहे. ‘विराट’ची निवृत्तीची तारीख दोन आठवड्यांवर आली तरी तिचे नंतर नक्की काय होणार याचे चित्र स्पष्ट नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)

सी हॅरियर्स विमाने शोभावस्तू
विराट’ने आधीच्या अवतारात ब्रिटिश नौदलात २७ वर्षे व नंतर भारतीय नौदलात ३० वर्षांहून अधिक काळ सेवा बजावली.

.या काळात युद्धनौकेने पाच लाखांहून अधिक सागरी मैलांची सफर केली.

सक्रिय सेवेत असताना ‘विराट’वर ११ सी हॅरियर ‘जंप जेट’ लढाऊ विमानांचा ताफा होता. गेल्या वर्षी ही विमाने ‘विराट’वरून काढून घेण्यात आली.

आता ती नौदलाच्या अन्य आस्थापनांना शोभावस्तू म्हणून देण्यात येणार आहेत.

 

६ मार्च रोजी निरोप समारंभ

भारतीय नौदलातील सर्वात जुनी युद्धनौका असल्याने ‘ग्रँड ओल्ड लेडी’ म्हणून आदराने उल्लेख केल्या जाणाऱ्या ‘विराट’च्या औपचारिक निवृत्तीसाठी, अनेक वेळा तारखा पुढे ढकलल्यानंतर, आता ६ मार्च हा निवृत्तीचा दिवस ठरला आहे. 

मुंबईच्या नौदल गोदीत उभ्या असलेल्या या विमानवाहू युद्धनौकेस त्या दिवशी समारंभपूर्वक सक्रिय सेवेतून निरोप दिला जाईल. त्या दिवशी सूर्यास्तास या युद्धनौकेवरील तिरंगा झेंडा, नौदलाचा ध्वज व सेवेत रुजू होताना फडकावलेली नामपताका शेवटची आणि कायमसाठी खाली उतरविली जाईल. 

नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल सुनील लान्बा व ‘विराट’वर काम केलेले अनेक अधिकारी या भावपूर्ण समारंभास उपस्थित राहतील. भारताने घेण्यापूर्वी ही युद्धनौका ‘हर्मिस’ या नावाने शही ब्रिटिश नौदलात होती.
त्यामुळे ब्रिटिश नौदलाचे प्रमुख अ‍ॅडमिरल सर फिलिप जोन्स व अन्य अधिकारीही यावेळी आवर्जून हजर राहतील, असे सांगण्यात आले.

Web Title: 'Virat' is also scraped?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.