विराट 'खेलरत्न', रहाणे 'अर्जुन' पुरस्काराने होणार सन्मानित !
By admin | Published: May 3, 2016 03:26 PM2016-05-03T15:26:35+5:302016-05-03T18:49:41+5:30
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी भारतीय संघाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या नावाचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. याबरोबरच बीसीसीआयने अर्जुन पुरस्कारासाठी अजिंक्य रहाणेच्या नावाची सिफारीश केली आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ : भारतीय क्रिकेट नियामक बोर्ड (बीसीसीआय़)ने क्रिडा क्षेत्रातील सर्वोच्च व प्रतिष्ठित अशा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी भारतीय संघाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या नावाचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. याबरोबरच बीसीसीआयने अर्जुन पुरस्कारासाठी अजिंक्य रहाणेच्या नावाची शिफारीश केली आहे. बीसीसीआयने चार वर्षानंतर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी एखाद्या क्रिकेटपटूच्या नावाच्या शिफारीश केली आहे.
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी यापूर्वी २०१२ साली माजी कर्णधार राहुल द्रविडच्या नावाचा प्रस्ताव पाठविला होता. परंतु त्यावेळी लंडन ऑलंपिक पदक विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त आणि निशानेबाज विजय कुमार यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.
आतापर्यंत केवळ दोन क्रिकेटपटूंना हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्यामध्ये सचिन तेंडुलकर (१९९७-९८) आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी (२००७) यांना खेलरत्न पुरस्कार देण्यात आला आहे. कोहलीला २०१३ यावर्षी अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आज क्रीडा मंत्रालयाकडे कोहली आणि अजिंक्य रहाणेची पुरस्कांरासाठी शिफारस करण्यात आलेली आहे. विविध क्रीडा प्रकारातून या पुरस्कारांसाठी खेळाडूंची शिफारस करण्यात येत असते. क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल बीसीसीआयने या दोघांची शिफारस केलेली आहे. कोहलीला देशातील सर्वोच्च क्रिडा पुरस्कारासाठी निशानेबाज जीतू राई, गोल्फर अनिर्बान लहरी, स्क्वॉश खेळाडू दीपिका पल्लीकल तथा एथलीट टिंटू लुका यांच्याशी स्पर्धा करावी लागणार आहे.