Virat Ramayan Mandir: मुस्लिम कुटुंबाने 'रामायण मंदिरा'साठी दान केली कोट्यवधी रुपयांची जमीन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 07:44 PM2022-03-22T19:44:21+5:302022-03-22T19:44:54+5:30
Virat Ramayan Mandir: बिहारच्या पूर्ण चंपारण जिल्ह्यात भव्य 'रामायण मंदिर' उभारले जात आहे.
पाटणा: धार्मिक सलोख्याचे उदाहरण मांडत बिहारमधील एका मुस्लिम कुटुंबाने मंदिरासाठी आपली कोट्यवधी रुपयांची जमीन दान केल्याची माहिती समोर आली आहे. पूर्व चंपारण जिल्ह्यातील कैथवालिया परिसरात भव्य रामायण मंदिर बांधले जाणार आहे. यासाठी एका मुस्लिम कुटुंबाने आपली अडीच कोटी रुपयांची जमीन मंदिरासाठी दिली आहे.
मुस्लिम कुटुंबाने मंदिरासाठी जमीन दान केली
बिहारच्या पूर्व चंपारणमधील कैथविसाया परिसरात 'भव्य रामायण मंदिर' बांधले जात आहे. हे बिहारमधील सर्वात मोठे देशातील मोठ्या मंदिरांपैकी एक असेल. मंदिराच्या बांधकामासाठी कैथवालिया येथील इश्तियाक अहमद खान यांनी आपली 16560 चौरस फुटांची जमीन दान करुन समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. मंदिर ट्रस्टचे प्रमुख आचार्य किशोर कुणाल यांनी सांगितले की, ही जमीन पूर्व चंपारण येथील व्यापारी इश्तियाक अहमद खान यांनी दान केली आहे.
दोन समुदायांमधील सामाजिक सौहार्दाचे उदाहरण
महावीर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आणि माजी आयपीएस आचार्य किशोर कुणाल म्हणाले की, इश्तियाक अहमद खान आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेली ही देणगी सामाजिक सलोखा आणि दोन समाजातील बंधुभावाचे उत्तम उदाहरण आहे. मुस्लिमांच्या मदतीशिवाय हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारणे कठीण झाले असते, असे ते म्हणाले. या मंदिराच्या उभारणीसाठी आतापर्यंत महावीर मंदिर ट्रस्टला 125 एकर जमीन मिळाल्याचे त्यांनी सांगितले. ट्रस्टला लवकरच या परिसरात आणखी 25 एकर जागा मिळणार आहे.
असे असेल मंदिर
हे भव्य रामायण मंदिर कंबोडियामधील जगप्रसिद्ध अंकोरवाटच्या धर्तीवर बांधले जात आहे. पूर्व चंपारणमधील चकिया-केसरियाजवळ जानकीपूर येथे हे 'विराट रामायण मंदिर' बांधले जाईल. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची उंची 270 फूट, लांबी 1080 फूट आणि रुंदी 540 फूट असेल.
मंदिराचे वैशिष्ट्य
हे मंदिर 'टेम्पल ऑफ टॉवर्स' म्हणून ओळखले जाईल. त्याच्या आजूबाजूला 13 मंदिरे बांधली जात आहेत आणि ती सर्व उंच शिखरे असलेली मंदिरे आहेत. शेजारील चार मंदिरे 180 फूट उंच आहेत. यासोबतच मंदिरात 33 फूट उंचीच्या भव्य शिवलिंगाची स्थापना करण्यात येणार आहे. या मंदिरासाठी एकूण 500 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. मंदिर ट्रस्ट लवकरच नवी दिल्लीतील संसद भवनाचे निर्माण करणाऱ्या जानकारांचा सल्ला घेईल.
मार्चपासून मंदिर उभारणीला सुरुवात
मार्चअखेर मंदिर उभारणीचे काम सुरू होईल. येत्या अडीच वर्षांत ही रचना उभारण्यात येणार असून त्यानंतर पुढील अडीच वर्ष त्याच्या फिनिशिंगसाठी लागणार आहेत. फिनिशिंगसाठी दक्षिण भारतातील कलाकारांना बोलावण्यात येणार आहे. महावीर मंदिर ट्रस्टकडे मंदिर बांधण्यासाठी इतका पैसा आहे की पायापासून शिखरापर्यंतची रचना तयार होईल. त्यानंतर गरज भासल्यास ट्रस्ट बिहारमधील जनतेची मदत घेईल.