वर्ल्डकपसाठी येणाऱ्या पाक नागरिकांसाठी व्हिसा नियम शिथिल
By admin | Published: March 12, 2016 03:03 AM2016-03-12T03:03:15+5:302016-03-12T03:03:15+5:30
आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेचे सामने पाहण्यासाठी भारतात येऊ इच्छिणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेट शौकिनांकरिता भारताने आपले व्हिसाचे नियम शिथिल केले आहेत.
नवी दिल्ली : आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेचे सामने पाहण्यासाठी भारतात येऊ इच्छिणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेट शौकिनांकरिता भारताने आपले व्हिसाचे नियम शिथिल केले आहेत. पाकिस्तानमधून भारतात क्रि केट सामने पाहण्यासाठी येणाऱ्यांना आता अर्जासोबत आपल्या परतीच्या विमान प्रवासाचे तिकीट जोडावे लागणार नाही. शिवाय ६५ वर्षांपेक्षा अधिक आणि १५ वर्षांहून कमी वयाच्या पाकिस्तानी नागरिकांना पोलीस ठाण्यात सूचना देण्यापासून सूट देण्यात आली आहे.
आगामी टी-२० वर्ल्ड कपसाठी येणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना जवळपास १००० व्हिसा जारी केले जाण्याची शक्यता आहे. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने बघण्यासाठी सर्वाधिक प्रेक्षक पाकिस्तानमधून येतील, असा अंदाज आहे. ‘व्हिसा जारी करण्यासाठी आम्ही २०१२ चे नियम पाळत असलो, तरी यावेळी परतीच्या विमान तिकिटाचा पुरावा सादर करण्याचा आग्रह धरला जाणार नाही. असा पुरावा देणे गैरसोयीचे असल्याचे काही पाकिस्तानी नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे व्हिसा मिळविण्यासाठी आता फक्त भारतात येतानाचे विमान तिकीट आणि अर्जदाराच्या नावावर जारी केलेले क्रिकेट सामन्याचे तिकीट तसेच हॉटेलमधील आरक्षणाची पावती जोडावी लागेल,’ असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियममध्ये होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यासाठी येणाऱ्या पाीकस्तानी नागरिकांना सुरक्षा दिली जाईल, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही स्पष्ट केले आहे. अधिकाऱ्याने हेही स्पष्ट केले आहे की, ६५ वर्षांवरील आणि १५ वर्षांखालील पाकिस्तानी नागरिकांना भारतातील क्रिकेट सामन्याच्या स्थळी उतरल्यानंतर पोलिसांना वर्दी देण्याचीही गरज पडणार नाही.(लोकमत न्यूज नेटवर्क)