विशाल ददलानीचं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना चॅलेन्ज; म्हणाला, "कॅमऱ्यासमोर...!"
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 18:45 IST2025-02-20T18:45:06+5:302025-02-20T18:45:46+5:30
पाणी स्नानासाठी आणि आचमनासाठी योग्य असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले होते...

विशाल ददलानीचं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना चॅलेन्ज; म्हणाला, "कॅमऱ्यासमोर...!"
संगीतकार विशाल ददलानीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना चॅलेन्ज दिले आहे. जर योगी कुंभमेळ्यातील पाणी पिण्या योग्य असल्याचा दावा करत असतील, तर त्यांनी स्वतः ते पिऊन दाखवावे, असे ददलानीने म्हटले आहे. दरम्यान, संगमच्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर बॅक्टेरिया आढळल्याच्या बातम्या आल्या होत्या. यासंदर्भात बोलताना, लोक द्वेषातून अशा गोष्टी पसरवत आहेत. पाणी स्नानासाठी आणि आचमनासाठी योग्य असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले होते.
काय म्हणाला विशाल ददलानी? -
कुंभमेळ्यातील संगमच्या पाण्यात हानिकारक बॅक्टेरिया असल्याचे वृत्त आल्यानंतर, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. यानंतर आता, संगीतकार विशाल दादलानी यांनी अशाच एका बातमीचा स्क्रीनशॉट जोडून आदित्यनाथ यांच्यासाठी एक मेसेज लिहिला आहे. विशाल लिहितो, "सर, द्वेष करणाऱ्यांची काळजी करू नका. आम्हाला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. कृपया कॅमेऱ्यासमोर नदीच्या पाण्याचा एक घोट घ्या."
काय म्हणाले होते योगी?
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत भाषण करताना महाकुंभाचा उल्लेख करत समाजवादी पक्षावर जोरदार निशाणा साधला. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाकुंभातील पाण्याच्या गुणवत्तेवरुन होणाऱ्या दाव्यावरही भाष्य केलं. महाकुंभातील संगमचे पाणी पिण्यासाठी आणि आंघोळीसाठीही योग्य असल्याचे मुख्यमंत्री योगींनी स्पष्टपणे सांगितले. संगमच्या पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण ८ ते ९ टक्के असल्याचे योगी आदित्यनाथ म्हणाले.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने एनजीटीकडे हा अहवाल सादर केला. महाकुंभ मेळ्याच्या दौऱ्यान उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नदीच्या पाण्यात फेकल कोलीफॉर्मची पातळी गुणवत्ता मानकांनुसार योग्य नसल्याचे अहवालातून सांगण्यात आलं. त्रिवेणी संगमाच्या पाण्याच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होत असताना पाणी केवळ आंघोळीसाठी योग्य नसून ते पिण्यासही योग्य असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले. हा महाकुंभ बदनाम करण्याच्या षडयंत्राचा भाग आहे. तसेच संगम आणि परिसरातील सर्व नाल्यांना टेप करण्यात आले असून शुद्धीकरणानंतरच पाणी सोडले जात आहे, असेही योगी आदित्यनाथ म्हणाले.