Raj Thackeray: हनुमान चालीसा पठणावरून मनसे प्रमुख राज ठाकरे एकाकी?; हिंदु संघटनांनी घेतली माघार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 10:26 AM2022-05-02T10:26:53+5:302022-05-02T10:28:00+5:30
ठाण्यातील उत्तर सभेत राज ठाकरेंनी ३ मे पर्यंत भोंगे हटवण्याचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर औरंगाबादच्या सभेतही राज ठाकरेंनी पुन्हा इशारा देत सरकारला भोंगे हटवण्यास सांगितले.
नवी दिल्ली – मनसे अध्यक्ष राज ठाकरे(MNS Raj Thackeray) यांनी येत्या ३ मे पर्यंत मशिदीवरील भोंगे हटवले गेले नाहीत तर ४ तारखेपासून लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा पठण करा असं देशभरातील हिंदु बांधवांना आवाहन केले. मात्र त्यांच्या आवाहनानंतर विश्व हिंदू परिषदेनंतर प्रतिक्रिया देत राज ठाकरेंना एकाकी पाडलं आहे. मनसेच्या हनुमान चालीसा पठण कार्यक्रमात विश्व हिंदू परिषद सहभागी होणार नाही असं राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी म्हटलं आहे.
विनोद बन्सल यांनी सांगितले की, राज ठाकरे दुष्प्रचाराचं राजकारण करत आहेत. विश्व हिंदू परिषद ही राजकीय संघटना नाही. कुठल्याही पक्षाशी त्याचा संबंध नाही. त्यामुळे हनुमान चालीसा कार्यक्रमाच्या भूमिकेशी विंहिंप सहमत नाही. विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दलाने मनसेच्या हनुमान चालीसा कार्यक्रमाला पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे हे वृत्त निराधार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या प्रखर हिंदुत्ववादी भूमिकेचं सर्व हिंदु संघटना स्वागत करतील असं मानलं जात होते. राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंगे याबाबत मुद्दा उपस्थित केला. राज ठाकरेंच्या या भाषणावरून मनसेच्या मुस्लीम पदाधिकाऱ्यांमध्येही नाराजी पसरली. अनेक पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र मनसे प्रमुख त्यांच्या विधानावर ठाम होते. ठाण्यातील उत्तर सभेत राज ठाकरेंनी ३ मे पर्यंत भोंगे हटवण्याचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर औरंगाबादच्या सभेतही राज ठाकरेंनी पुन्हा इशारा देत सरकारला भोंगे हटवण्यास सांगितले.
The Vishva Hindu Parishad (@VHPDigital) said it is not participating in the Maharashtra Navnirman Sena (MNS) event to play '#HanumanChalisa' on loudspeakers outside the mosques in #Maharashtra on May 3.@vinod_bansalpic.twitter.com/nEBKOKAPyu
— IANS (@ians_india) May 1, 2022
राज ठाकरेंच्या विधानानंतर उत्तर प्रदेश गोवा, कर्नाटकसह इतर राज्यांत मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी हिंदु संघटना आक्रमक झाल्या. अनेक ठिकाणी जिल्हाधिकारी, पोलिसांना निवेदन देण्यात आली. उत्तर प्रदेशात योगी सरकारने ११ हजार भोंगे खाली उतरवले. योगी सरकारच्या या निर्णयाचं कौतुक राज ठाकरेंनी केले. औरंगाबादच्या सभेत जर उत्तर प्रदेशात भोंगे उतरवले जावू शकतात तर महाराष्ट्रात का नाही असा सवाल त्यांनी केला होता. येत्या ४ मे रोजी देशभरातील हिंदु बांधवांनी पोलीस परवानगी घेऊन मशिदीसमोर हनुमान चालीसा लाऊडस्पीकरवर लावावी असं आवाहन केले होते. मात्र विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दलसारख्या मोठ्या हिंदु संघटनांना यातून माघार घेत असतील तर राज ठाकरेंच्या आवाहनाला राज्याबाहेर किती प्रतिसाद मिळतो हे पाहणं गरजेचे आहे.