2.75 लाख गावांमध्ये भगवान रामाची प्रतिमा लावणार, मंदिर बांधण्याआधी VHP चा मोठा कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 10:00 PM2020-01-02T22:00:06+5:302020-01-02T22:00:44+5:30
राम मंदिराची बांधणी ही सरकारच्या पैशातून नाही, तर समाजाच्या पैशातून झाली पाहिजे, असे विश्व हिंदू परिषदचे म्हणणे आहे.
नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिर बांधण्याआधी विश्व हिंदू परिषदने एका मोठ्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. विश्व हिंदू परिषद देशातील 2.75 लाख गावांमध्ये भगवान रामाची प्रतिमा लावणार आहे. रामोत्सव या नावाने हा कार्यक्रम 25 मार्चपासून सुरू होणार असून 8 एप्रिल रोजी संपन्न होणार आहे. 1989 साली राम मंदिर आंदोलनादरम्यान, या गावांतून राम मंदिर बांधण्यासाठी विटा आल्या होत्या.
अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी हिंदू विश्व परिषद जास्त सक्रीय आहे. आता मंदिर बांधण्याआधी हिंदू विश्व परिषदकडून मोठ्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. तसेच, राम मंदिरासाठी पुजारींचा शोध हिंदू विश्व परिषदकडून सुरु आहे. याशिवाय, राम मंदिराची बांधणी ही सरकारच्या पैशातून नाही, तर समाजाच्या पैशातून झाली पाहिजे, असे विश्व हिंदू परिषदचे म्हणणे आहे.
दुसरीकडे, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निकालामुळे अयोध्येतील वादग्रस्त रामजन्मभूमीवर राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे सरकारने राम मंदिराच्या बांधणीसाठी तयारी सुरू केली आहे. सरकारने यासंबंधीत सर्व प्रकरणे पाहण्यासाठी वेगवेगळे विभाग तयार केले आहेत. अतिरिक्त सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांच्या अध्यक्षेखाली याची पाहणी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, केंद्र सरकारला राम मंदिर बांधणीसाठी ट्रस्ट तयार करायचे आहे. केंद्र सरकार सध्या यासंबंधीचे काम करत आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत केंद्र सरकार राम मंदिर बांधणीसाठी ट्रस्ट तयार करण्यात येईल, अशी शक्यता आहे.
(राम मंदिराच्या बांधणीचा मुहुर्त ठरला? या तिथीपासून होऊ शकते बांधकामास सुरुवात)